बोनी कपूर यांना प्रियांका चोप्रासोबत करायचा होता चित्रपट, नावही ठरले होते, पण अचानक...

आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांझबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 

नम्रता पाटील | Updated: Apr 13, 2024, 05:54 PM IST
बोनी कपूर यांना प्रियांका चोप्रासोबत करायचा होता चित्रपट, नावही ठरले होते, पण अचानक... title=

Boney Kapoor Why Not Cast Priyanka Chopra : अभिनेता दिलजीत दोसांझच्या गाण्यासह अभिनयाचेही सर्वत्र चाहते आहेत. दिलजीत दोसांझने पंजाबीसोबत हिंदी चित्रपटात काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. एक उत्तम अभिनेता आणि अप्रतिम गायक म्हणून त्याला ओळखले जाते. सध्या तो ‘अमर सिंह चमकीला’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांझबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 

बोनी कपूर हे सध्या 'मैदान' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सध्या ते या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आता बोनी कपूर यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत काम न करण्याचे कारण सांगितले आहे. विशेष म्हणजे बोनी कपूर यांनी या चित्रपटाचे नावही ठरवले होते. यात तिच्यासोबतच दिलजीत दोसांझ झळकणार होता. पण प्रियांका चोप्रामुळेच हा चित्रपट होऊ शकला नाही.

"आम्ही तिच्या परतण्याची वाट पाहिली, पण..."

यावेळी बोनी कपूर म्हणाले, "दिलजीत हा एक उत्तम अभिनेता आहे. मी काही वर्षांपूर्वी प्रियांका चोप्रा आणि दिलजीत या दोघांसोबत एक चित्रपट करणार होतो. या चित्रपटाचे नाव सरदारनी असे  होते. या चित्रपटाच्या शूटींगलाही सुरुवात झाली होती. पण अचानक प्रियांकाला क्वांटिको या हॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यावेळी तिने आम्हाला काही वेळ थांबण्याची विनंती केली. आम्ही तिच्या परतण्याची खूप वाट पाहिली. पण प्रियांकाने क्वांटिको या वेबसीरिजचा दुसरा सीझनही साईन केला."

"प्रियांकाच्या या वागण्यामुळे आम्ही शेवटी तिच्या परतण्याची आशा सोडली. कारण प्रियांका ही हॉलिवूडच्या अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाली होती. त्यामुळे मग आम्ही हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला", असा किस्सा बोनी कपूर यांनी सांगितला. 

बोनी कपूर यांच्याकडून दिलजीत दोसांझचे तोंडभरुन कौतुक

यावेळी बोनी कपूर यांनी दिलजीत दोसांझचे तोंडभरुन कौतुक केले. "मी दिलजीतचे पंजाबी आणि हिंदी चित्रपट पाहिले आहेत. तो फार उत्तम विनोद करतो आणि त्याचे टायमिंग जबरदस्त आहे. कोणताही नवीन चित्रपट करताना एखादा नवीन चेहरा त्यात असणं फार चांगलं असते", असेही बोनी कपूर यांनी म्हटले.  दरम्यान बोनी कपूर हे सध्या मैदान या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात अजय देवगण, प्रियामणी, गजराज राव हे कलाकार झळकत आहेत. या चित्रपटाची दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे. तर याची निर्मिती बोनी कपूर यांनी केली आहे.