सैराट : आर्ची निघाली कॉलेजला, इथे घेतला प्रवेश

'सैराट' फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूने आपले लक्ष पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळवलं आहे. नुकताच तिने उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एका लोकप्रिय विद्यालयात प्रवेश घेतला. सैराट चित्रपटात रिंकूचा अभिनय इतका प्रभावी ठरला की, तिला राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Updated: Oct 9, 2017, 11:38 AM IST
सैराट : आर्ची निघाली कॉलेजला, इथे घेतला प्रवेश title=

मुंबई : 'सैराट' फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूने आपले लक्ष पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळवलं आहे. नुकताच तिने उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एका लोकप्रिय विद्यालयात प्रवेश घेतला. सैराट चित्रपटात रिंकूचा अभिनय इतका प्रभावी ठरला की, तिला राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

'सैराट' चित्रपट प्रसिद्ध होऊन आता बरेच दिवस उलटले आहेत. पण, त्यातील भूमिका आणि कलाकार यांच्या भोवतीचे वलय आजही कायम आहे. इतकेच नव्हे तर, लोकांच्या मनावर उमटलेला सैराटचा प्रभावही कायम आहे. सैराटमधील सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका चोख पार पाडली आहे. चित्रपटातील व्यक्तीरेखा आणि ती निभावणारे कलाकार यांनी तोडीस तोड अभिनय केला आहे. पण, या सर्वात भाव खाऊन गेले ते परशा आणि आर्ची. त्यातही आर्चीला अभिनयासाठीचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यामुळे तिच्या भोवतीचे ग्लॅमर वलय अधिकच गडद झाले. त्यातूनच तिच्या चाहत्यांच्या संख्येत अमाप वाढ झाली. इतकी की, तिला अनेक कार्यक्रमांसाठी निमंत्रणे येऊ लागली. कार्यक्रमादरम्यान तिला भेटण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना आवरण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.

दरम्यान, आर्चीच्या अभिनय कारकीर्दीचा आलेख असा वाढत होता. मात्र, त्या काळात तिने शिक्षणाकडे मुळीच दूर्लक्ष केले नाही. तीने इयत्ता दहावीची बोर्डाची परिक्षा दिली. त्यात ती उत्तीर्णही झाली. आता तिच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय होता ती पुढील शिक्षणासाठी कोणते शहर आणि कोणते कॉलेज निवडणार. पण, नुकताच हा प्रश्नही निकालात निघाला.

आर्चीने पुण्यातील एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. पण, आजही सैराटची जादू कायम असल्याने रिंकूभोवतीचा घोळका काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे रिंकू कॉलेजला आली की तिच्याभोवती एकच गराडा पडताना दिसतो. या सगळ्यात आता रिंकूचीही चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेसारखीच बाहेरुन परीक्षा देण्याचा निर्णय रिंकूला घ्यावा लागत आहे. मात्र कॉलेजला जाऊन कॉलेज डेज एन्जॉय करायचा अनुभव मात्र काही घेता येत नसल्याची खंत तिला सध्या सतावत आहे.