मनोरंजन विश्वात माहिची नवी इनिंग

क्रिकेटसोबतच धोनी 'या' नव्या खेळीसाठी सज्ज 

Updated: Dec 9, 2019, 04:06 PM IST
मनोरंजन विश्वात माहिची नवी इनिंग  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वात आपल्या खेळीने क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महेंद्रसिंह धोनी याने कायमच त्याच्या प्रत्येक कृतीतून चाहत्यांपुढे आदर्श प्रस्थापित केला आहे. क्रीडा वर्तुळात दमदार कामगिरी करणारा धोनी आता येत्या काळात मनोरंजन विश्वात त्याचं नशीब आजमावणार आहे. खरंतर जाहिरात, चॅट शो अशा माध्यमातून तो मनोरंजन विश्वाची एक बाजू अनुभवून गेला आहे, आता तो एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. 

'टाईम्स नाऊ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार माही लवकरच एका कार्यक्रमाची निर्मिती करणार आहे, ज्यामाध्यमातून तो सैन्यदल अधिकाऱ्यांच्या काही रंजक गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. 

'स्टुडिओ नेक्स्ट' यांच्या साथीने टेरिटोरियल आर्मीतील पॅराशूट रेजिमेंटचं मानद लेफ्टनंट पद असणाऱ्या धोनीने एक अनोखा साहित्यसंग्रह प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचं ठरवलं आहे. काही भागांमध्ये हा संग्रह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाच्या माध्यमातून परम वीर चक्र आणि अशोक चक्र विजेत्यांवर भाष्य केलं जाणार आहे. सध्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु असून पुढच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अतिशय रंजक अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सैन्यदलाच्या सेवेत रुजू असणाऱ्यांच्या खासगी आयुष्यावर आणि त्याच्याशी निगडीच प्रसंगांवर भाष्य करणार आहे. या माध्यमातून धोनी हा देशाच्या संरक्षणार्थ आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या काही वीर जवानांचं आयुष्य प्रकाशझोतात आणणार आहे. 

सध्याच्या घडीला या कार्यक्रमाच्या संहिता लेखनाचं काम सुरु आहे. शिवाय काही औपचारिक कामं पूर्ण करत लवकरच कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे आता माहिची ही नवी इनिंग नेमकी कशी असणार हे पाहणं अतीशय उत्सुकतेचं ठरणार आहे.