'स्वराज्यरक्षक संभाजी'चा निरोप, कलाकारांसह प्रेक्षकही भावूक

छत्रपतींच्या अखेरच्या संघर्षाने डोळ्यांच्या कडा पाणावल्या.... 

Updated: Mar 1, 2020, 08:28 AM IST
'स्वराज्यरक्षक संभाजी'चा निरोप, कलाकारांसह प्रेक्षकही भावूक  title=
स्वराज्यरक्षक संभाजी

पुणे : 'दर्या, नभामधून, सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला.... ', अशा ओळी कानांवर पडल्या की आपोआपच अंगावर काटा उभा राहतो. जवळपास दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या स्वराज्यरक्षक संभाची या मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा आधार घेत, स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांच्या शौर्यगाथांचा आधार घेत एक अद्वितीय असा जीवनप्रवास या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता आला. 

डॉ. अमोल कोल्हे, शंतनू मोघे, प्राजक्ता गायकवाड आणि सहकलाकारांच्या दमदार अभिनयाने मालिकेला जीवंतपणा दिला. अशा या अतिश. लोकप्रिय  मालिकेचा शेवटचा भाग नुकताच प्रदर्शित करण्यात आला. मुळात गेल्या काही दिवसांपासून मालिका अखेरच्या टप्प्यात आल्याचं कळताच प्रेक्षकांमध्ये निराशेचं वातावरण होतं. सोशल मीडियावरही मालिकेप्रतीचं हे वातावरण पाहायला मिळालं. 

एका असामान्य आणि अद्वितीय अशा पराक्रमी व्यक्तीची गाथा, त्यांच्या जीवनातील शेवटचा काळ यावर मालिकेतून अतिशय संवेदनशीलपणे आणि तितक्याच प्रत्ययकारीपणे भाष्य करण्यात आलं. अशा या मालिकेचा अखेरचा भाग प्रदर्शित झाल्यानंतर, झी मराठी वाहिनीच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन एक आभार व्यक्त करणारी पोस्ट करण्यात आली. 

सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये एका लखोट्यावर 'श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौ रिव राजते। यदं कसावनी लेखा वर्तते कस्य नो परि।', असे शब्द लिहिलेले दिसत आहेत. मालिकेच्या नावाचाही उल्लेख असणाऱ्या या पोस्टवर ठळक अक्षरांमध्ये 'धन्यवाद' असं लिहित मालिकेला प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. 

पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून, या मालिकेत 'महाराणी येसूबाई' यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वडू-तुळापूर या ठिकाणी जाऊन महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं.  यावेळी प्रत्येक महिलेने येसुबाईंसारखे ढाल -तलवार लाठीकाठी शिकावं असा आग्रही सूर प्राजक्ताने आळवला. शिवाय मालिकेला सुरुवातीला नकार दिला असला तरीही अखेर या मालिकेत प्रजाक्तानेत येसुबाईंची भूमिका साकारली. त्यावेळी आपल्यावर साक्षात महाराणी येसुबाई आणि छत्रपती संभाजी राजे यांचा वरदहस्त होता असं म्हणत तिने आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. 

मालिकेतील बरीच दृश्य ही अवघडही होती, त्याचविषयी सांगताना प्राजक्ता म्हणाली 'अवघड म्हणण्यापेक्षा प्रत्येक दृश्य हे आव्हानात्मक होतं. महाराणी येसुबाईंच्या पहिल्या प्रवेशासाठी पहिल्यांदाच चित्रीत केलेलं दृश्यं हे संस्मरणीय.' मालिकेशी भावनिकदृष्ट्या जोडल्या गेलेल्या प्राजक्ताने यावेळी महिलांना धाडसानं प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी प्रेरित केलं. प्रत्येक महिलेनं स्वत्वाची ओळख जपणं गरजेचं असून, मनातले शिवविचार आणि शंभूविचार मागे पडून देऊ नका. महिलांनी मर्दानी खेळ खेळा असा आग्रह केला.