विवेक ओबेरॉयसह ९००हून अधिक कलाकार म्हणतात 'भाजपलाच मत द्या'

'देशाला मजबूर नव्हे मजबूत सकरारची गरज, 

Updated: Apr 10, 2019, 09:20 PM IST
विवेक ओबेरॉयसह ९००हून अधिक कलाकार म्हणतात 'भाजपलाच मत द्या' title=

मुंबई : loksabha election 2019   निवडणूकांच्या प्रचाराची धामधूम शेवटच्या टप्प्यात आलेली असताना कलाविश्वंही सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावलं आहे. जवळपास ९०० हून अधिक कलाकारांनी भाजपला मत देण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे. या कलाकारांमध्ये विवेक ओबेरॉय, पंडित जसराज आणि रिटा गांगुली यांच्या नावांचा समावेश आहे. देशाला मजबूर नव्हे, मजबूत सरकारची गरज आहे, असा संदेश या कलाकारांनी एकत्रितरित्या दिला आहे. 

बुधवारी जारी करण्यात आलेल्या पत्रकातून या कलाकारांनी भाजपसाठी मतदारांकडे मतांची मागणी केली. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची देशाला गरज आहे. दहशतवाद आणि यासारखी इतर आवाहनं पाहता देशाला मजबूर नव्हे तर मजबूत सकरारची गरज आहे, त्यामुळे हे सरकार येत्या काळातही टीकण्याची गरज आहे, असं या पत्रकात नमूद करण्यात आलं. 

एकत्रितरित्या हे पत्रक जारी करणाऱ्यांमध्ये शंकर महादेवन, त्रिलोकी नाथ मिश्रा, कोयना मित्रा, अनुराधा पौडवाल आणि हंस राज हंस यांच्याही नावांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच जवळपास ६०० कलाकांरी भारताचं संविधान धोक्यात असल्याचा मुद्दा अधोरेखित करत भाजप आणि सहकारी पक्षांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठीचं आवाहन मतदारांना केलं होतं. ज्यामध्ये अमोल पालेकर, नसिरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, उषा गांगुली या कलाकारांचा समावेश होता. त्यामुळे या कलाकारांना एक प्रकारे प्रत्युत्तर मिळाल्याचं स्पष्ट होत आहे.