‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा बायोपिक लवकरच पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?

Gadkari Movie : भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 6, 2023, 10:50 AM IST
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा बायोपिक लवकरच पडद्यावर, कोण साकारणार भूमिका? title=
(Photo Credit : PR Handover)

Gadkari Movie : नितीन गडकरी… देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग भुसारी यांचे आहे.

‘गडकरी’ या चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारेल? किंवा या प्रमुख भूमिकेत कोण पाहायला मिळेल यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा खुलासा होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, ‘नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.’ 

हेही वाचा : 'या' फोटोत असलेले 8 स्टार किड्स कोण, तुम्ही ओळखू शकता का?

या चित्रपटाच्या निर्मितीची सुरुवात ही 2019 मध्ये झाली होती. पण कोरोना काळात हे काम थांबलं होतं. या चित्रपटासाठी नितीन गडकरी यांच्याविषयी सगळी माहिती ही त्यांचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून मिळवली आहे. या चित्रपटातून कोणताही मुद्दा सगळ्यांसमोर न मांडता फक्त तरुणांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी बनवण्यात आला आहे. त्याचं कारण म्हणजे नितीन गडकरी यांचं कोणतंही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना त्यांनी राजकारणात स्वत: चं फक्त स्थान मिळवलं नाही तर नागरिकांच्या मनात स्वत: चं स्थान देखील मिळवलं आहे. 

दरम्यान, या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. तर मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.या चित्रपटात कोणते कोणते कलाकार आहेत याची घोषणा लवकरच होणार आहे. तर हा चित्रपट 27 ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.