बंद कारमध्ये सापडला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह! पोलिसांकडून तपास सुरु

प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेते विनोद थॉमस यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. विनोद थॉमस यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये एका हॉटेलबाहेर सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरु आहे.

Updated: Nov 19, 2023, 09:44 AM IST
बंद कारमध्ये सापडला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह! पोलिसांकडून तपास सुरु title=

Vinod Thomas Died : प्रसिद्ध मल्याळम चित्रपट अभिनेते विनोद थॉमस (Vinod Thomas) यांचे वयाच्या 45 व्या वर्षी आकस्मिक निधन झालं आहे. केरळ (kerala) येथील पंपाडीजवळील एका हॉटेलमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये अभिनेते विनोद थॉमस हे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (kerala Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून विनोद थॉमस यांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पंपाडीजवळील हॉटेलमध्ये पार्क केलेल्या कारमध्ये अभिनेता विनोद थॉमस मृतावस्थेत आढळून आले होते.   पोलिसांनी सांगितले की हॉटेल व्यवस्थापनाने आम्हाला माहिती दिली की एक व्यक्ती त्यांच्या हॉटेलच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये पडून आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारमध्ये पाहिले असता ती व्यक्ती अभिनेते विनोद थॉमस असल्याचे समोर आलं. पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आम्हाला कारमध्ये अभिनेता सापडला होता आणि नंतर त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हॉटेलवर पोहोचलेल्या पोलिसांनी पाहिलं की विनोद हे त्यांच्या कारमध्ये पडून होते. आरडाओरडा करूनही त्यांनी कारचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर पोलिसांनी काच फोडून दरवाजा उघडला. यानंतर विनोद थॉमस यांना बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात आणलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तपासामध्ये लोक अनेक तासांपासून बेपत्ता विनोद थॉमसचा शोध घेत होते. विनोद थॉमस यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियाव वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांनाच धक्का बसला.

विनोद थॉमस यांच्या मृत्यूमागचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांच्या मृत्यूचे कारण कारमधील एसीमधून निघणारा विषारी वायू असू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतरच याबाबत माहिती समोर येईल. विनोद थॉमस यांच्या शवविच्छेदनाबाबत पोलिस अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर नेटिझन्सनी विनोद थॉमस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. चाहत्यांनी दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांना खंबीर राहण्यास सांगितले.