शरद पवारांच्या बायोपिकसाठी सुबोध भावे इच्छूक

अभिनेता सुबोध भावे हा बायोपिक स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो.

Updated: May 26, 2019, 08:41 PM IST
शरद पवारांच्या बायोपिकसाठी सुबोध भावे इच्छूक title=

प्रेरणा कोरगावकर, प्रतिनिधी, झी २४ तास : अभिनेता सुबोध भावे हा बायोपिक स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. सुबोध भावेनं अनेक बायोपिक साकारले असले तरी त्याला शरद पवारांच्या व्यक्तिमत्वानं भुरळ घातलीय. शरद पवारांवरील बायोपिक करायला आवडेल असं सुबोध भावेनं म्हटलं आहे.

सुबोध भावे याने आत्तापर्यंत लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर यांचे बायोपिक केले. आता त्याने शरद पवार यांचा बायोपिक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अभिनेता सुबोध भावेनं अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यातही बायोपिक साकारण्यात त्याचा हात कोणीही धरणार नाही. सुबोधनं साकारलेले लोकमान्य टिळक असोत की बालगंधर्व सुबोधच्या भूमिकांची चर्चाही झाली. एखाद्या व्यक्तिरेखेत बेमालूमपणे प्रवेश करण्यात सुबोधचा हातखंडा आहे. अनेक बायोपिक केल्यानंतर सुबोधला आता शरद पवारांवर बायोपिक करण्याची इच्छा आहे. शरद पवारांची भूमिका साकारायला आवडेल असं सुबोध भावेनं सांगितलं आहे. त्याला शरद पवार का करायचाय याचं कारणही रंजक आहे.

मनात काय चाललंय ते तुम्हाला काहीच कळू द्यायचं नाही. हे फार अवघड आहे. शरद पवार ५५ वर्ष राजकारणात आहेत. त्यांनी जेवढं बघितलंय तेवढं आज राजकारणात कोणीच पाहिलेलं नाही. मी चेष्टा म्हणून म्हणत नाही, पण सतत सातत्यानं व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल, असं सुबोध भावे म्हणाला.

सुबोध भावे स्वतः शिवसेनेच्या चित्रपट सेनेचा पदाधिकारी आहे. तरीही त्याला पवारांमधील वेगळेपण भावलं आहे. सुबोधनं जेव्हा राहुल गांधींची मुलाखत घेतली तेव्हा तो राहुलचा बायोपिक करणार याची चर्चा झाली. पण सुबोधला शरद पवार साकारायचे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमुळे पवारांचं दिल्लीतलं राजकीय वजन थोडंफार जरी घटलं असलं तरी महाराष्ट्रात त्यांच्याबद्दलचं आकर्षण मात्र कमी झालेलं नाही.