#GirishKarnad : चाहत्यांना आठवले 'मालगुडी....'मधील 'स्वामी'चे बाबा, तर शबाना आझमींना ४३ वर्षांची मैत्री...

'मालगुडी डेज' या कलाकृतीतील कर्नाड यांच्या भूमिकेविषयी अनेकांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Updated: Jun 10, 2019, 12:31 PM IST
 #GirishKarnad : चाहत्यांना आठवले 'मालगुडी....'मधील 'स्वामी'चे बाबा, तर शबाना आझमींना ४३ वर्षांची मैत्री...  title=
स्वामीचे शिस्तप्रिय बाबा...

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि अभ्यासक गिरीश कर्नाड यांनी सोमवारी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी बंगळुरू येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. भारतीय कलाजगतात फक्त ठराविक क्षेत्रातच सक्रिय न राहता सर्वच बाबतीत आपल्या कौशल्याच्या बळावर अतुलनीय योगदान देत त्यांनी पुढच्या पिढीसाठी एक भक्कम पाया रचला. 

कर्नाड यांच्या निधनानंतर अनेकांनीच त्यांच्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या विविध कलाकृतींनाही या निमित्ताने पुन्हा सर्वांसमोर आणण्यात आलं. एक कलाकार म्हणून संपन्न व्यक्तीमत्त्व असणाऱ्या कर्नाड यांच्या नसण्यामुळे साऱ्या कलाविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. पण, कलेच्याच माध्यमातून ते कायमच सर्वांसोबत आपल्यामध्येच असल्याची भावनाही चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून कर्नाड यांना श्रद्धांजली वाहिली. तर, अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीही एक हरहुन्नरी कलाकार आपल्यात नसल्याचं दु:ख व्यक्त केलं. यावेळी त्यांनी गिरीश कर्नाड यांच्यासोबतचं आपलं मैत्रीचं नातं एका सुरेख अशा फोटोच्या माध्यमातून सर्वांसमक्ष ठेवलं.

रुपेरी पडद्यावर अगदी सलमानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटातून झळकलेल्य़ा कर्नाड यांना चाहत्यांकडूनही श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. अनेकांनी 'मालगुडी डेज' या कलाकृतीतील कर्नाड यांच्या भूमिकेविषयी आपल्या भावना लिहिल्या आहेत. 

'आम्हाला गिरीश कर्नाड म्हणजे स्वामीचे  शिस्तप्रिय बाबा... अशीच प्रतिमा ठाऊक आहे', अशा अतिशय आपलेपणाच्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. कलाविश्वाच्या या पटलावर राजेपण सिद्ध करणाऱ्या अष्टपैलू गिरीश कर्नाड यांना Zee24Tass.com कडून भावपूर्ण श्रद्धांजली.