हेलिकॉप्टरमधून उतरून राहुल गांधी अमेठीतून दाखल करणार उमेदवारी अर्ज

राहुल गांधी यांचं अमेठीशी जुनं नातं आहे. ते याच मतदारसंघातून सलग तीन वेळ खासदार म्हणून निवडून आले आहेत

Updated: Apr 10, 2019, 09:08 AM IST
हेलिकॉप्टरमधून उतरून राहुल गांधी अमेठीतून दाखल करणार उमेदवारी अर्ज  title=

अमेठी : लोकसभा निवडणूक २०१९ साठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज उत्तर प्रदेशातल्या अमेठीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राहुल गांधी अमेठीसोबतच केरळच्या वायनाडमधूनही निवडणूक लढवत आहेत. अमेठीमधून अर्ज दाखल करण्याआधी अमेठीत राहुल गांधी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रादेखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या १५ वर्षांपासून राहुल गांधी हेच अमेठीचे खासदार आहेत. अमेठीत राहुल गांधींविरोधात भाजपाकडून स्मृती इराणी रिंगणात आहेत. स्मृती इराणी उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.  अमेठीत ६ मे रोजी मतदान होणार आहे. 

हेलिकॉप्टरमधून राहुल गांधी आज अमेठीला दाखल होणार आहेत. संजय गांधी रुग्णालय परिसरातील गेस्ट हाऊसजवळ हे हेलिकॉप्टर उतरेल. यासाठी इथं एक हॅलिपॅडही बनवण्यात येतंय. राहुल सकाळी साडे नऊ वाजल्याच्या दरम्यान आई सोनिया गांधी आणि बहिण प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासोबत इथे उतरतील. 

अमेठी आणि राहुल गांधी

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मुंशीगंजहून गौरीगंज दरम्यान तीन किलोमीटर रस्त्यावर रोड शोही करणार आहेत. दुपारी १२ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. उल्लेखनीय म्हणजे, राहुल गांधी यांचं अमेठीशी जुनं नातं आहे. ते याच मतदारसंघातून सलग तीन वेळ खासदार म्हणून निवडून आले आहेत. २००४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा याच मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर २००९ मध्ये आणि २०१४ मध्येही ते विजयी झाले.

स्मृती इराणी देणार टक्कर

काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात भाजपनं राहुल गांधींना टक्कर देण्यासाठी पुन्हा एकदा स्मृती इराणी यांचीच निवड केलीय. पाचव्या टप्प्यासाठी आजपासून अर्थात १० एप्रिलपासून नामांकन प्रक्रिया सुरू होतेय. अमेठीमध्ये पाचव्या टप्प्यात अर्थात ६ मे रोजी मतदार पार पडेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी ११ एप्रिल रोजी अमेठीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अनेक मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.