तुमचं हृदय म्हणणार 'अटॅक गो बॅक', 3 वर्षं आधीच कळणार हार्ट अटॅक?

heart attack technology developed by researcher 3 years in advance

Updated: Feb 25, 2022, 07:46 PM IST
तुमचं हृदय म्हणणार 'अटॅक गो बॅक', 3 वर्षं आधीच कळणार हार्ट अटॅक?  title=

Heart Attack Symptoms : जगभरात दरवर्षी लाखो लोक हार्ट अटॅकनं मरण पावतात. बदलती जीवनशैली, वेळी-अवेळी जेवण, तणाव अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. मात्र आता शास्त्रज्ञांनी एक असं तंत्रज्ञान विकसित केलंय. ज्यामुळे तीन वर्ष आधीच हार्ट अटॅकचा धोका समजू शकेल. 

लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. त्यामुळे हार्ट अटॅकनं मरण पावणाऱ्यांची संख्या निश्चितच कमी होणार आहे. सध्याच्या घडीला वयोवृद्ध नागरिकांसह तरूणाईतही हृदयविकाराचं प्रमाण वाढलंय. मात्र नव्या तंत्रज्ञानामुळे रूग्णाला तीन वर्षं आधीच हृदयविकाराची माहिती मिळेल, ही नवी टेस्ट रूग्णांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. 

असं झालं संशोधन
संशोधनासाठी संशोधकांनी हार्ट अटॅक आलेल्या रूग्णांच्या सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीनची तपासणी केली. या रूग्णांच्या ट्रोपोनिनची प्रमाणित चाचणीही करण्यात आली. ही तिच प्रथिनं आहेत, जी हृदयविकार असलेल्या रूग्णांच्या रक्तातून बाहेर पडतात. संशोधकांच्या अहवालानुसार जवळपास 2.5 दशलक्ष NHS रूग्णांमध्ये सीआरपी पातळी वाढली होती आणि त्यांच्या ट्रोपोनिन चाचण्या पॉझिटीव्ह आल्या होत्या.

या रूग्णांमध्ये तीन वर्षात मृत्यूची शक्यता सुमारे 35 टक्के इतकी होती. याच संशोधनाच्या आधारे रूग्णांवर योग्यवेळी उपचार केले गेल्यास त्यांचा जीव वाचू शकतो असा दावा या संशोधकांनी केलाय. 

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या सांगण्यानुसार छातीत दुखणं, अस्वस्थता, थकवा, गळा, जबडा आणि कंबरदुखी अशी अनेक हार्ट अटॅकची लक्षणं आहेत. याशिवाय हृदयविकार असलेल्या अनेक रूग्णांना खांदेदुखीचा त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे हे संशोधन यशस्वी झाल्यास अनेकांची हार्ट अटॅकपासून सुटका होईल अशी आशा करायला हरकत नाही.