"मुख्याध्यापकांनी आम्हाला एकांतात बोलावलं, कमरेवर हात ठेवला अन्..."; 12 वीच्या मुलींनी पोलिसांना दिली धक्कादायक माहिती

Crime News: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थिनींनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात निवेदन देत तक्रार केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 13, 2023, 12:34 PM IST
"मुख्याध्यापकांनी आम्हाला एकांतात बोलावलं, कमरेवर हात ठेवला अन्..."; 12 वीच्या मुलींनी पोलिसांना दिली धक्कादायक माहिती title=

Girl Students Assualted: मध्य प्रदेशात (Madhya Pradehs) 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी शाळेच्या मुख्याध्यापकांवरच गंभीर आरोप केले आहेत. पन्ना जिल्ह्यातील एका शाळेच्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांवर अश्लील चाळे केल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थिनींनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्याध्यापकाविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे पोलीसही याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  

पन्ना जिल्ह्यापासून 100 किमी अंतरावर असणाऱ्या शाहनगर येथील शाळेत हा प्रकार घडला आहे. 12 वीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक वीरेंद्र सिंह राजपूत आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते असा आरोप केला आहे.  दोन्ही विद्यार्थिनींनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात निवेदन देत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

मुलींनी पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत लिहिलं आहे की, शाळेत वार्षिक कार्यक्रम होता, कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण जात असताना मुख्याध्यापकांनी आम्हाला रोखलं. एकांतात त्यांनी आम्हाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यांनी अनेकदा आम्हाला एकटीला खोलीत बोलावलं आहे. ते जबरदस्ती आमचा हात पकडत असत, कमरेवर हात ठेवत असतं असाही आरोप मुलींनी केला आहे. 

मुलींनी आपल्याला परीक्षेत अनुत्तीर्ण करतील अशी भीती वाटत असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही असं सांगितलं आहे. दरम्यान आता परीक्षा संपल्या असल्याने मुख्याध्यपकांविरोधात त्यांनी तक्रार केली असून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जे आपल्यासह झालं ते इतर मुलींसोबत होऊ नये अशी आपली इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

मुख्याध्यापक विरेंद्र सिंह राजपूत याआधीही वादात अडकले आहेत. याआधी पार पडलेल्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह डान्स करतानाचा तसंच शिक्षिकांना हाताने केक भरवत असल्याचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

पन्ना जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी सूर्य भूषण मिश्र यांनी आपण या प्रकरणाची दखल घेतली असून विभागीय चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करत असल्याचं सांगितलं होतं. ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे. दुसरीकडे पोलीसही याप्रकरणी चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल समोर आल्यानंतर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.