आई-वडिलांची योग्य काळजी घेत नसाल तर ही बातमी नक्की वाचा; 84 वर्षीय वडिलांनी मुलांना शिकवला आयुष्यभराचा धडा

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) येथे एका 84 वर्षीय व्यक्तीने आपली सगळी संपत्ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नावे करुन टाकली आहे. नत्थू सिंह गेल्या सात महिन्यांपासून आश्रमात राहत असून त्यांनी आपल्या मुलांना संपत्तीतून बेदखल केलं आहे. मुलं आपली योग्य काळजी घेत नसल्याने नत्थू सिंह यांनी संपत्ती उत्तर प्रदेश सरकारच्या (Uttar Pradesh Government) नावे केली आहे.   

Updated: Mar 6, 2023, 06:26 PM IST
आई-वडिलांची योग्य काळजी घेत नसाल तर ही बातमी नक्की वाचा; 84 वर्षीय वडिलांनी मुलांना शिकवला आयुष्यभराचा धडा title=

आई-वडिलांचं वय झाल्यानंतर मुलं त्यांची जबाबदारी न घेता त्यांना वृद्धाश्रमात पाठवत असल्याच्या अनेक घटना आपल्या आजुबाजूला घडत असतात. संपूर्ण आयुष्य ज्यांच्यासाठी खर्च केलं, तीच मुलं जेव्हा आधाराची गरज असताना साथ सोडून देतात तेव्हा आई-वडिलांवर मोठं आभाळ कोसळतं. पण जेव्हा आई-वडील मुलांना धडा शिकवण्याचं ठरवतात तेव्हा काय करु शकतात हे उत्तर प्रदेशातील  (Uttar Pradesh) एका 85 वर्षीय व्यक्तीने दाखवून दिलं आहे. कुटुंब आपली योग्य काळजी घेत नसल्याने त्यांनी आपल्या मुलांसह सुनांनाही संपत्तीतून बेदखल केलं असून आपल्यावर अंतिम संस्कार करण्याचा हक्कही काढून घेतला आहे. 

मुलांच्या बेजबाबदारपणाला कंटाळून उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने आपली सगळी संपत्ती उत्तर प्रदेश सरकारच्या (Uttar Pradesh Government) नावे करुन टाकली आहे. इतकंच नाही तर आपल्या शरिरालाही दान केलं आहे. आपल्या मृत्यूपत्रात त्यांनी सर्व संपत्ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नावे करुन टाकली आहे. आपल्या मृत्यूनंतर जमिनीवर शाळा किंवा रुग्णालय उभं करावं अशी इच्छा त्यांनी मृत्यूपत्रात व्यक्त केली आहे. 

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील खतौली जिल्ह्यातील नत्थू सिंह हे गेल्या सात महिन्यांपासून आश्रमात वास्तव्य करत आहेत. मुलं तसंच सूना आपली योग्य काळजी घेत नसल्याने नत्थू सिंह नाराज होते. यामुळे त्यांनी मुलांना आपल्या संपत्तीतून बेदखल केलं. तसंच सर्व संपत्ती उत्तर प्रदेश सरकारच्या नावे करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मृत्यूनंतर मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा असंही त्यांनी मृत्यूपत्रात म्हटलं आहे. तसंच त्यांच्या जमिनीवर शाळा किंवा हॉस्पिटल उभारत गरिंबांवर उपचार करा अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

नत्थू सिंह यांना 4 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलगा लग्नानंतर सहारनपूर येथे आपल्या कुटुंबासह राहत आहे. सरकारी शाळेत तो शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पत्नीच्या मृत्यूनंतर नत्थू सिंह एकटेच पडले असून आपल्या गावातील घरात एकटे राहत होते. सात महिन्यांपूर्वी ते एका आश्रमात जाऊन राहू लागले होते. मुलांनी आपल्याला वाऱ्यावर सोडल्याने त्यांनी संपत्तीत त्यांना कोणताही वाटा न देण्याचं ठरवलं आणि सगळी संपत्ती उत्तर प्रदेश सरकारच्या नावे केली. 

नत्थू सिंह यांनी आपल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा हक्कही कुटुंबाकडून हिरावून घेतला आहे. आपला मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये द्यावा असं त्यांनी सांगितलं आहे.