योगींनी निभावला राजधर्म, पाणावलेल्या डोळ्यांनी बैठका सुरु ठेवल्या

नेहमीच्या वेळेवर मुख्यमंत्री हॉलमध्ये आले. पण ....

Updated: Apr 20, 2020, 06:03 PM IST
योगींनी निभावला राजधर्म, पाणावलेल्या डोळ्यांनी बैठका सुरु ठेवल्या title=

लखनऊ : वेळ सकाळी साधारण साडे दहा वाजताची. कोरोना उपाययोजनांसाठी उत्तर प्रदेश सरकारने तयार केलेल्या टीम ११ ची बैठक आज लोकभवनच्या ऐवजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानी होणार होती. पण अनेकांच्या मनात विचार होता की मुख्यमंत्री आज बैठक घेतील की नाही. कारण आदित्यनाथ यांच्या वडिलांची तब्बेत बिघडल्याची चर्चा सोशल मीडियात पसरली होती. पण नेहमीच्या वेळेवर मुख्यमंत्री हॉलमध्ये आले. पण त्यांच्या चेहऱ्यावर ते चिंतीत असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

एरवी मुख्यमंत्री बैठकीच्या वेळी चेहऱ्यावरील मास्क खाली करून ठेवतात. पण आज असं झालं नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लपवले जात होते. डोळे उदास दिसत होते. सर्व काही ठिक नसल्याचं दिसत होतं. पण त्यापलिकडे राजधर्माचं पालन करण्याला प्राधान्य देत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठक वेळेवर सुरु केली. टीम ११ च्या अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा सुरु केली, आढावा घेतला आणि सूचनाही केल्या.

दरम्यान, १० वाजून ४४ मिनिटांच्या दरम्यान बैठकीत अशा व्यक्तीचं आगमन झालं जी फारच कमी वेळा बैठकीत दिसते. मुख्यमंत्र्यांचे सर्वात जवळचे मानले जाणारे बल्लू राय दुःखी चेहऱ्यानं बैठकीत आले आणि त्यांनी एक कागद मुख्यमंत्र्यांना दिला. कागदावरील मजकूर वाचून कुणाशी बोलावं याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बल्लूला दिले. बल्लूने फोन लावला आणि मुख्यमंत्र्यांनी फोनवर चर्चा केली.

मिनिटभराची चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर फोन करतो म्हणून सांगितलं. बल्लू निघून गेल्यानंतर मुख्यमंत्री काही सेकंद शांत राहिले आणि पुन्हा त्यांनी बैठक सुरु केली. रोजच्याप्रमाणे बैठक सुरु राहिली.

यावेळी सर्वांनी पाहिलं की मुख्यमंत्री योगी यांचे डोळे पाणावले आहेत. कदाचित तेव्हाच त्यांना वडिलांच्या निधनाचं वृत्त कळलं होतं. पण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या जनतेच्या सेवेला प्राधान्य दिलं आणि कोविडविरोधात उपाययोजनांसाठी बैठक घेत राहिले.

सर्वांनाच माहीत आहे की मुख्यमंत्री होण्याआधीपासूनच योगी आदित्यनाथ एक संन्याशी आहेत, गोरक्षपीठाधीश्वर आहेत. पण वडिलाच्या निधनाचं वृत्त आल्यानंतरही त्यांचं काम सुरुच राहिलं. एका बाजुला पाणावलेले डोळे ते दुःखी असल्याची जाणीव करून देत होते, तर दुसरीकडे २३ कोटी जनतेचं हितही तितकंच महत्वाचं होतं. वडिलांचा मृत्युही त्यांना विचलित करू शकला नाही.

 

पित्याच्या अंत्यसंस्कारात सहभागी न होऊन दिला मोठा संदेश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं, की वडिलांच्या निधनानं मला मोठं दुःख झालं. माझे ते पूर्वाश्रमीचे जन्मदाता आहेत. जीवनात इमानदारी, कठोर परिश्रम आणि निःस्वार्थी वृत्तीनं लोकांसाठी समप्रित कार्य करण्याचे संस्कार मला लहानपणी त्यांनी दिले. अंतिम क्षणी त्यांचे दर्शन घेण्याची माझी इच्छा होती. पण वैश्विक महामारी कोरोना व्हायरसविरोधात देशात सुरु असलेली लढाई उत्तर प्रदेशच्या २३ कोटी जनतेच्या हितासाठी पुढे नेण्याचं कर्तव्य माझ्यावर असल्याने मी अंत्यसंस्काराला येऊ शकणार नाही. उद्या २१ एप्रिलला अंतिम संस्कार कार्यक्रमात लॉकडाऊन आणि कोरोनाला पराभूत करण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांमुळे भाग घेऊ शकणार नाही. पूजनिय माँ, पूर्वाश्रमीशी संबंधित सर्व सदस्यांना माझं आवाहन आहे की, त्यांनी लॉकडाऊनचं पालन करावे आणि अंत्यसंस्काराच्यावेळी कमीत कमी लोकांनी उपस्थित राहावे. पूज्य पिताजींच्या स्मृतींना कोटी-कोटी नमन करून मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. लॉकडाऊन संपल्यानंतर मी भेटीसाठी येईन.