काँग्रेससाठी यंदा अमेठीचा पेपर कठीण

राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात कांटे की टक्कर

Updated: May 3, 2019, 05:08 PM IST
काँग्रेससाठी यंदा अमेठीचा पेपर कठीण title=

रामराजे शिंदे, अमेठी : उत्तर प्रदेशात अमेठी मतदारसंघात राहुल गांधी विरूद्द स्मृती इराणी यांच्यात चुरशीची लढाई आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची रणनीती भाजपानं आखली आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेठीमध्ये भाजपनं जोरदार फिल्डिंग लावली आहे. २०१४ च्या निवडणुकीत गांधींचं मताधिक्य घटवणाऱ्या स्मृती इराणी यांनाच भाजपनं पुन्हा संधी दिली आहे. इथलं जातीय समीकरण पाहिलं तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना इथं जास्त कष्ट घेण्याची गरज असल्याचं दिसतं आहे. 

अमेठीमध्ये २२ टक्के मतदार ओबीसी आहेत. १८ टक्के मुस्लीम तर अनुसूचित जातीचे १५ टक्के मतदार आहेत. १२ टक्के ब्राह्मण मतदार इथं फरक पाडू शकतात. यातल्या सवर्ण आणि ओबीसींच्या ३४ टक्के मतांच्या जोरावर राहुल गांधींना पराभूत करण्याची रणनीती भाजपनं आखली आहे. मुस्लीम आणि एससी मतदारांच्या आधारावर गांधींच्या आशा जिवंत आहेत. सपा-बसपा महाआघाडीनं अमेठीमध्ये उमेदवार दिला नसल्यामुळे हे गणित जुळून येणं शक्य आहे.

मात्र तरीही काँग्रेससाठी अमेठीचा पेपर यंदा सोपा नाही. फूड पार्क तसंच अन्य उद्योग भाजपमुळे मतदारसंघात आले नसल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे एवढी वर्षं गांधी घराण्याचा खासदार असूनही अमेठी विकासापासून वंचित राहिल्याचा आरोप भाजप करते आहे.

अमेठीची जनताही काँग्रेसवर नाराज असल्याचं चित्र आहे. पारंपारिक काँग्रेस मतदार आणि सपा-बसपाच्या मतांच्या जोरावर काँग्रेस अध्यक्ष आपला मतदारसंघ राखतात की स्मृती इराणी जायंट किलर होतात. याची उत्सुकता निकालाच्या दिवशीच शमणार आहे.