काळा पैसा: खबरी द्या.. ५ कोटी रूपये जिंका; प्राप्तिकर विभागाची नवी शक्कल

बेनामी व्यवहार किंवा मालमत्तेबाबत प्राप्तिकर विभागाला विशिष्ट माहिती दिल्यास खबऱ्याला एक कोटी रुपये बक्षिस मिळू शकतं तर परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या धनाबाबत माहिती दिल्यास पाच कोटी रुपयांचे बक्षिस मिळू शकतं.

Updated: Jun 2, 2018, 01:47 PM IST
काळा पैसा: खबरी द्या.. ५ कोटी रूपये जिंका; प्राप्तिकर विभागाची नवी शक्कल title=

मुंबई: परदेशातील काळा पैसा शोधण्यासाठी प्राप्तिकर विभागानं आता नवी शक्कल लढवली आहे. परदेशातील काळं धन तसंच बेहिशेबी मालमत्तेबाबत महिती देणाऱ्याला प्राप्तिकर विभागानं चक्क एक ते पाच कोटींचं बक्षिस ठेवलंय. त्यामुळे पुढील काळात प्रप्तिकर विभाग मोठ्या कारवाया करण्याची शक्यता आहे. बेनामी व्यवहार किंवा मालमत्तेबाबत प्राप्तिकर विभागाला विशिष्ट माहिती दिल्यास खबऱ्याला एक कोटी रुपये बक्षिस मिळू शकतं तर परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या धनाबाबत माहिती दिल्यास पाच कोटी रुपयांचे बक्षिस मिळू शकतं.

..तर ५० लाखांच बक्षीस

महत्त्वाचं म्हणजे, यासोबतच प्राप्तीकर खबऱ्या पारितोषिक योजनेतही सुधारणा करण्यात आली आहे. प्राप्तिकरात अथवा भारतातली मालमत्तेसंदर्भात मोठ्या प्रमाणात कर चुकवण्यात आल्याची माहिती दिल्यास ५० लाखांचं बक्षिस मिळणार आहे. खबऱ्यानं दिलेली माहिती आणि त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. बेनामी मालमत्ता, व्यवहारांवर लगाम घालण्यासाठी प्राप्तिकर विभागानं ही योजना आखलीये.

थेट जनतेचाही सहभाग

गेल्या काही काळापासून काळ्या पैशांवर टाच आणण्यासाठी सरकार आणि सरकारचा प्राप्तिकर विभाग जंग जंग पाछाडत आहे. पण, त्याला अद्याप म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. त्यामुळे काळा पैसा बाळगणाऱ्या मंडळींना चाप लावण्याच्या कार्यात जनतेलाही सहभागी करून घ्यावे यासाठी प्राप्तिकर विभागाने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.