सरकारी कर्मचाऱ्यांना योगा ब्रेक...ऑफिसात ५ मिनिटं योगा करण्यासाठी मोदी सरकारकडून मुभा

कार्यालयीन काम करताना कर्मचारी ताजेतवाने असावेत.

Updated: Sep 5, 2021, 07:37 PM IST
सरकारी कर्मचाऱ्यांना योगा ब्रेक...ऑफिसात ५ मिनिटं योगा करण्यासाठी मोदी सरकारकडून मुभा title=

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालाय योगा ब्रेक, हो तुम्ही बरोबर वाचलंय. आता सरकारी कर्मचाऱ्यांना रोज ऑफिसमध्ये ५ मिनिटं योगासनं करता येणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना ५ मिनिटांचा ब्रेक देण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्य़ासाठी केंद्राने वाय ऍप देखील तयार केलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये दररोज पाच मिनिटे योगासने करण्याची मुभा मोदी सरकारनं दिलीय. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वाय-ब्रेक ऍप डाऊनलोड करण्याच्या सूचना केंद्रीय कार्मिक मंत्रालयानं दिल्या आहेत.

योगासनं केल्यामुळे आरोग्याला कोण कोणते फायदे होतील, कोण कोणती योगसनं असतात आणि ते कसं करावं या संपूर्ण माहिती या ऍपमध्ये देण्यात आली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयानं वाय-ब्रेक ऍप तयार केलं आहे.

कार्यालयीन काम करताना कर्मचारी ताजेतवाने असावेत, आणि त्यांना मोठ्या उत्साहाने काम करावं असं मोदी सरकारला वाटतंय. त्यासाठीच कार्यालयात रोज पाच मिनिटं योगासनं करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच कॉर्पोरेट जगतातील लोकही सतत कामात व्यस्त असतात. सतत कामामुळे येणारा तणाव दूर करण्यासाठी योगासने, प्राणायाम, ध्यान अत्यंत उपयोगी असल्याचे देखील या ऍपमध्ये म्हटले आहे.

दिल्ली, मुंबई, चेन्नई यासह सहा प्रमुख महानगरामध्ये वाय-ब्रेक ऍपच्या वापराचा पथदर्शी प्रकल्प 2020 मध्ये राबविण्यात आला होता. तो यशस्वी ठरल्यानंतर आता हे ऍप खुले करण्यात आले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी यासाठी ते ताजेतवाने असायला हवेत यात दुमत नाही,  मात्र योगासनांच्या नावाखाली सरकारी कर्माचाऱ्यांनी आणखी कामचुकारपणा करायला नको एवढीची माफक अपेक्षा.