मुख्यमंत्री फडणवीस कर्नाटकमधील सरकार पाडणार? काँग्रेसचे आमदार शहांच्या भेटीला

जारकोहळी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नाराज आमदारांची मोट बांधत आहेत.

Updated: Dec 29, 2018, 01:27 PM IST
मुख्यमंत्री फडणवीस कर्नाटकमधील सरकार पाडणार? काँग्रेसचे आमदार शहांच्या भेटीला title=

नवी दिल्ली: कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यावेळी या सगळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असल्याची चर्चा दिल्लीत सुरु आहे. काँग्रेसचे नाराज आमदार रमेश जारकीहोळी हे भाजप अध्यक्ष अमित शाहंची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याचे समजते. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नाराजीमुळे रमेश जारकीहोळी यांना कर्नाटकमध्ये मंत्रीपद देण्यात आले नव्हते. जारकोहळी यांनी बेताल वक्तव्ये करून पक्षाला अनेकदा अडचणीत आणले होते. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांशी असणारी त्यांची जवळीक अनेकांच्या डोळ्यात खुपणारी होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या आदेशावरून जारकोहळी यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. त्यामुळे नाराज झालेले जारकोहळी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नाराज आमदारांची मोट बांधत आहेत. काँग्रेसमधील १८, जेडीएसचे २ आणि अपक्ष २ असे एकूण २२ आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जारकोहळी आणि अमित शाह यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपचे माजी मुख्यमंत्री एडियुरप्पा हेदेखील नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. 

काँग्रेस-जेडीएसमध्ये मतभेद 
कर्नाटकात भाजपला सर्वात जास्त जागा मिळूनही त्यांना बहुमत सिद्ध करण्यात यश आले नव्हते. त्यामुळे येडियुरप्पा यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ते फक्त अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले होते. कर्नाटकमध्ये आता काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार आहे. पण हे सरकार बनवण्याआधी कर्नाटकमध्ये मोठं सत्तासंघर्ष पाहायला मिळाला होता. सगळ्यात कमी जागा असूनही जेडीएसला मुख्यमंत्रीपद मिळालं. पण कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसमध्ये सगळे काही आलबेल नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

कुमारस्वामींची 'ते' वक्तव्य

मुख्यमंत्रीपद स्वीकारून मी विष पीत आहे, असे वक्तव्य कुमारस्वामींनी केले होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच हे सरकार पडतं की काय अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. यानंतर स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली. तेव्हादेखील दोन्ही पक्षांमध्य़े असेलले मतभेद समोर आले होते. आता आमदारांमध्ये असलेली नाराजी समोर येत आहे. त्यामुळे कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेसचे सरकार पडणार की आमदरांची मनधरणी करुन त्यांना शांत करणार करण्यात यश येणार, याकडे सगळयांचे लक्ष आहे.