दिल्लीत काँग्रेस - 'आप' आघाडी होण्याची शक्यता मावळली

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे. 

Updated: Apr 18, 2019, 11:01 PM IST
दिल्लीत काँग्रेस - 'आप' आघाडी होण्याची शक्यता मावळली title=

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून सुंदोपसुंदी सुरू आहे. अखेर काँग्रेसचे दिल्ली प्रभारी पी. सी. चाको यांनी आता आघाडी होण्याची शक्यता नसून सर्व ७ जागांवर उमेदवारांची घोषणा लवकरच केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, त्याआधी 'आप'कडून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. 'आप' आघाडीसाठी उत्सुक होती. भाजपविरोधात काँग्रेससोबत हात मिळविण्यास राजी होती. मात्र, काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नाही, असे सांगत काँग्रेस भाजपला मदत करत असल्याचा आरोप 'आप'कडून करण्यात आला होता.

आपसाठी ४ जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दाखवली होती. मात्र काँग्रेसला केवळ दोनच जागा देण्यास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तयार होते. तसेच दिल्लीखेरीज पंजाब, हरियाणा आणि गोव्यामध्येही आघाडी करावी आणि काँग्रेसने काही जागा सोडाव्यात, अशी 'आप'ची अपेक्षा होती. मात्र काँग्रेसची याला तयारी नव्हती. त्यामुळे काँग्रेसने आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दिल्लीतील नेत्यांनी 'आप'बरोबर जाण्यास नकार दर्शविला होता. त्यामुळे काँग्रेसकडून आघाडीसाठी हात पुढे करण्यात येत नव्हता अशीही चर्चा आहे.