कोरोना रिटर्न्स! कोविडमुळे 'या' राज्याने तातडीने दिले मास्क घालण्याचे आदेश

Covid-19 in India : कोरोना पुन्हा एकदा देशात डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्राच्या शेजारील राज्याने मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 18, 2023, 05:08 PM IST
कोरोना रिटर्न्स! कोविडमुळे 'या' राज्याने तातडीने दिले मास्क घालण्याचे आदेश title=
(फोटो सौजन्य - PTI)

Covid-19 in India : गेली तीन वर्षे जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतात पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 चा धोका भारतात पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. रविवार, देशात सुमारे 335 नवीन कोविड बाधितांची प्रकरणे नोंदवण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे आता देशभरातील एकूण बाधितांची संख्या 1701 झाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे कोविड-19 मुळे पाच लोकांचा मृत्यूही झाला आहे. यापैकी चार केरळचे आणि एक उत्तर प्रदेशातील होते. त्यानंतर आता कर्नाटक सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे.

कोरोनाचा नवीन प्रकार जेएन-1 केरळमध्ये आल्याने देशातील सर्व राज्यांनी आरोग्य व्यवस्थेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. केरळमध्ये कोरोनाचा सर्वात प्राणघातक प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यातून धडा घेत कर्नाटक सरकारने महत्त्वाची नियमावली जारी केली आहे. आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

देशात हिवाळ्यासह कोरोनाचे जोरदार पुनरागमन झाल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, रविवारी कोरोनाचे 335 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच, उत्तर प्रदेशमध्ये एक आणि केरळमध्ये चार मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाचे सक्रिय रुग्ण 1700 हून अधिक झाले आहेत. केरळमध्ये कोरोनाचा सर्वात नवीन प्रकार आढळून आला आहे, ज्यामुळे प्रथम सिंगापूर आणि नंतर अमेरिका आणि चीनमध्ये प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दुसरीकडे, शेजारच्या राज्यात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता कर्नाटक सरकारनेही एक नियमावली जारी केली आहे.

कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सोमवारी ज्येष्ठ नागरिक आणि सहविकारांनी ग्रस्त असलेल्यांनी मास्क घालण्याचा सल्ला दिला. कर्नाटकातील कोडागु येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री दिनेश गुंडू राव यांनी घाबरण्याची गरज नसून काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सांगितले. "आम्ही काल एक बैठक घेतली जिथे आम्ही चर्चा केली की काय पावले उचलली पाहिजेत. आम्ही लवकरच एक सूचना जारी करू. सध्या ज्यांचे वय 60 वर्षांहून अधिक आहे आणि ज्यांना हृदयविकार आणि इतर गंभीर आजार आहेत त्यांनी मास्क घालावा," असे मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले.

"आम्ही सरकारी रुग्णालयांना तयार राहण्यास सांगितले आहे. केरळला लागून असलेली सीमारेषेवर अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मंगळुरू, चमनाजनगर आणि कोडगू या जिल्ह्यांनी सतर्क राहावे. चाचणी वाढवली जाईल. ज्या लोकांना श्वसनाचा त्रास आहे त्यांना अनिवार्य चाचणी करावी लागेल," असेही मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविडच्या सुरुवातीपासून देशातील एकूण प्रकरणांची संख्या 4.50 कोटींवर पोहोचली आहे. त्यापैकी 4.46 कोटी लोक या आजारातून बरे झाले आहेत. यामुळे, देशाचा रिकव्हरी रेट 98.81 टक्के इतका अपेक्षित आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात कोविड-19 मुळे आतापर्यंत 5.33 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. आपल्या देशात या आजाराने मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. आतापर्यंत देशात कोविड-19 च्या 220.67 कोटी लसी देण्यात आल्या आहेत.