ब्यूटी पार्लर, अपमान आणि बदला... तिहेरी हत्याकांडाचा अखेर असा झाला उलगडा

पोलिसांनी अनेक पथकं तयार केली आणि अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली  

Updated: Nov 1, 2022, 11:26 PM IST
ब्यूटी पार्लर, अपमान आणि बदला... तिहेरी हत्याकांडाचा अखेर असा झाला उलगडा title=

Crime News : तिहेरी हत्याकांडाचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पश्चिम दिल्लीतल्या अशोक नगर परिसरातील एका घरात तीन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि मोलकरणीचा समावेश आहे. चाकू भोसकून या तिघांचीही हत्या करण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं तयार केली होती. अवघ्या काही तासात याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे. 

आरोपींच्या तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. अपमानाचा बदला घेण्यासाठी तीहेरी हत्याकांड घडवून आणल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींमध्ये एक मुलगी आणि तिच्या प्रियकराचा समावेश आहे. आरोपींनी समीर अहूजा आणि शालू अहूजा यांची निर्घृ्ण हत्या केली. त्याचवेळी त्यांच्या घरात काम करणारी मोलकरीण सपना आल्याने आरोपींनी तिचीही हत्या केली.

नेमकी घटना काय?
मृत शालू अहूजा यांचं ब्यूटी पार्लर होतं. दहा दिवसांपूर्वी ब्यूटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका मुलीला आणि तिच्या प्रियकर मित्राला शालू अहूजा यांनी नोकरीवरुन काढून टाकलं होतं. यावेळी शालू अहूजा यांनी त्यांचा अपमान केला. या अपमानाचा बदला घेण्यासाठी या दोघांनी कट रचला. 

हत्या केल्यानंतर रोकड केली लंपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार मजली बंगल्याच्या तळमजल्यावर शालू अहूजा आणि मोलकरीन सपना यांचे मृतदेह आळढले. तर समीर अहूजा यांचा मृतदेह बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर सापडला. पोलिसांच्या मते आरोपींची संख्या 4 ते 5 इतकी असू शकते. यातल्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण मुख्य आरोपी असलेले ती मुलगी आणि तिचा प्रियकर फरार आहेत. हत्या केल्यानंतर आरोपींनी घरातील लॅपटॉप, रोकड आणि काही मौल्यवान सामाना लंपास केलं. पोलिसांनी आरोपींकडून आयफोन 13, तसंच हत्येसाठी वापरलेली शस्त्र जप्त केली आहेत. 

एका वर्षापूर्वी झाले होते शिफ्ट
मंगळवारी सकाळच्या दरम्यान तिहेरी हत्याकांडाची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना मिळालेल्या माहितीत अशोक नगर परिसरातील एका बंगल्यात चोरी झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना तीन मृतदेह आढळले. समीर अहूजा हे प्रॉपर्टी आणि कपड्यांचा व्यवसाय करत होते. वर्षभरापूर्वीच अहूजा कुटुंब विकासपूरी इथून पश्चिम दिल्लीतल्या अशोक नगर परिसरात राहिला आले होते. त्यामुळे त्यांची परिसरात फारशी ओळख नव्हती.

3 वर्षांची मुलगी सुरक्षित
समीर अहुजा आणि शालू अहूजा यांच्या हत्येवेळी त्यांची तीन वर्षांची मुलगी बंगल्यातच होती, पण ती दुसऱ्या खोलीत झोपली असल्याने सुदैवाने बचावली. आरोपींनी घरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही आणि डीवीआरही काढून आपल्यासोबत नेले होते.