दाभोलकर हत्या: पुनाळेकर व भावेला १ जूनपर्यंत कोठडी

पुनाळेकर याने गुन्ह्यातील हत्यारांची विल्हेवाट लावण्यास मदत केली.

Updated: May 26, 2019, 04:30 PM IST
दाभोलकर हत्या: पुनाळेकर व भावेला १ जूनपर्यंत कोठडी title=

पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांनाही रविवारी पुण्यातील सीबीआयच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा या दोघांवर आरोप आहे. 

या दोघांना रविवारी नवी मुंबईहून दुपारी पुण्यात आणण्यात आले. त्यापूर्वी  न्यायालयाबाहेर सनातनचे कार्यकर्ते  आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. संजीव पुनाळेकर हे सनातन संस्थेचे वकील आहेत. याशिवाय अनेक प्रकरणात अटक झालेल्या हिंदुत्ववाद्यांचे वकील आहेत. पुनाळेकर आणि भावेशी भेटण्याची मागणी सनातनच्या समर्थकांनी केली होती. ती मागणी पोलिसांनी फेटाळून लावली. तर या दोघांविरोधात भीम आर्मीने शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर घोषणाबाजी केली. 

'मॉर्निंग वॉकला जात चला'; पुनाळेकरांच्या 'त्या' वक्तव्याची पुन्हा चौकशी करा- श्रीपाल सबनीस

शरद कळसकरच्या जबाबानंतर दोघांना अटक करण्यात आली. दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी विक्रम भावे याने रेकी केली तर पुनाळकर याने गुन्ह्यातील हत्यारांची विल्हेवाट लावण्यास मदत केली असल्याची माहिती सीबीआयचे विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयाला दिली. तर दुसरीकडे संजीव पुनाळेकर यांनी स्वत: आपली बाजू मांडली. माझ्यावरचा आरोप हा जामीनपात्र आहे. शरद कळसरकरने ऑक्टोबर महिन्यात दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई झाली असेल तर त्याला इतका उशीर का झाला, असा सवाल पुनाळेकर यांनी उपस्थित केला. मात्र, न्यायालयाने पुढील तपासासाठी दोघांना १ जूनपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.