#Nirbhaya : देशाला हादरवणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणाचा घटनाक्रम

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणानं साऱ्या देशाला हादरा बसला होता.

Updated: Mar 20, 2020, 07:22 AM IST
#Nirbhaya : देशाला हादरवणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणाचा घटनाक्रम title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : चालत्या बसमध्ये एका २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन या अमानवी अत्याचारांनंतर तिला दयनीय अवस्थेच रस्त्यावर सोडणाऱ्या नराधमांना अखेर फाशी होणार आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी शक्य त्या सर्व मार्गांचा वापर करत आरोपींची फाशी कशी टाळता येईल याचा प्रयत्न केला. पण, अखेर निर्भयाला न्याय मिळण्यासाठी उशिराचा का असेना पण, सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर तो दिवच उजाडल्याचं म्हटलं जात असून फाशी निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे.  

Nirbhaya प्रकरणात घटनांची ही साखळी पाहताना आताही काळजात चर्रssss होतं. आरोपींना फाशी होत असल्याच्या निमित्ताने या प्रकरणी पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंतची घटनांची साखळी खालीलप्रमाणे...  

१६ डिसेंबर २०१२- दिल्ली एका चालत्या बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार करत तिचा अतिशय अमानवी कृत्य करत लैंगिक छळ करण्यात आला. बलात्कार करणाऱ्यांमध्ये एक अल्पवयीन होता. 

१८ डिसेंबर २०१२- दिल्ली पोलिसांनी यापैकी चौघांना अटक केली ज्यामध्ये बस चालकाचाही समावेश होता. पुढे उरलेल्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. 

२९ डिसेंबर २०१२- शरीरावर झालेल्या प्रत्येक दुखापतीला आणि असह्य वेदनांना तोंड देणाऱ्या निर्भयाने सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

२३ जानेवारी २०१३- अल्पवयीन वगळता पाच बलात्काऱ्यांविरोधात चार्जशीट दाखल  करण्यात आली. 

२८ जानेवारी २०१३- एका नराधमाला JJBकडून अल्पवयीन म्हणून घोषित करण्यात आलं.

२ फेब्रुवारी २०१३- पाच नराधमांविरोधात १३ गुन्हे नोंदवण्यात आले. ज्यामध्ये त्यांच्यावर हत्येच्या गुन्ह्याचीही नोंद झाली. 

११ मार्च २०१३-  बस चालक राम सिंह याने तिहार कारागृहात गळफास लावून आत्महत्या केली. 

३१ ऑगस्ट २०१३- अल्पवयीन गुन्हेगाराला बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवत ३  वर्षांसाठी त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. 

१३ सप्टेंबर २०१३- फास्ट ट्रॅक न्यायालयाकडून चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ज्यानंतर हा खटला दिल्ली उच्चन्यायालयाकडे फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होण्यासाठी पोहोचला. 

१३ मार्च २०१४- दिल्ली उच्च न्यायालयाकडूनही फाशीच्या शिक्षेचं समर्थन करण्यात आलं. 

३ एप्रिल २०१६ - सर्वोच्च न्यायालयात दोषींच्या याचिकेवर सुनावणीस सुरुवात झाली. 

५ मे २०१७- सर्वोच्च न्यायालयानेही अक्षय ठाकुर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश सिंह यांच्या फाशीच्या शिक्षेचं समर्थन केलं. 

९ जुलै २०१८ - सर्वोच्च न्यायालयाने पवन, मुकेश आणि विनयची पुनर्विचार याचिका फेटाळली. 

 

१३ डिसेंबर २०१८ - निर्भयाच्या कुटुंबीयांनी खटला अधिक वेगाने चालवण्यासाठी न्यायालयाचं दार ठोठावलं. 

८ नोव्हेंबर २०१९ - आरोपी विनय शर्माने दया याचिका दाखल केली. 

६ डिसेंबर २०१९ - एमएचएकडून विनय शर्माची दया याचिका फेटाळण्याचं सांगण्यात आलं. 

१० डिसेंबर २०१९ - आरोपी अक्षय ठाकुरने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. 

१८ डिसेंबर २०१९ - सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली. 

 १९ डिसेंबर २०१९ - दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने चारपैकी एका आरोपीचा गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळला.

१७ जानेवारी २०२० - दिल्ली न्यायालयाने चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. 

१९ मार्च २०२० - फाशीला स्थगिती देण्याची याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली. 

२० मार्च २०२०- तिहार कारागृहात चारही दोषींना पहाटे साडे पाच वाजता फाशी देण्यात आली.