कोरोनामुळे भारतीय रेल्वेची महत्त्वाची सेवा तूर्तास बंद

प्रवासाला निघण्यापूर्वी हे ध्यानात ठेवा 

Updated: Mar 15, 2020, 07:31 PM IST
कोरोनामुळे भारतीय रेल्वेची महत्त्वाची सेवा तूर्तास बंद  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वच क्षेत्रांतून प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात येत आहेत. शक्य त्या सर्व परिंनी Corona कोरोनाचा प्रादुर्भाव कशा प्रकारे कमी करता येईल यासाठीच प्रशासकीय यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिकही लक्ष केंद्रीत करत आहे. 

भारतातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ज्यामुळे सर्वत्र तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे निर्देश शासनाकडून देण्यात आल्यानंतर शहरांचाही वेग मंदावू लागला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा रेल्वेकडूनही एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचा परिणाम लांब बल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांवर होऊ शकतो. 

पश्चिम रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार रेल्वे डब्यांच्या निर्जंतुकीकरणास सुरुवात झाली असून, त्यापुढचं पाऊल म्हणून आता व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून एसी डब्यांमध्ये दिली जाणारी चादर पुढील सुचना येईपर्यंत यापुढे मिळणार नाही. शिवाय या डब्यांमध्ये यापुढे पडदेही नसतील. 

सहसा दर पंधरा दिवसांनंतर रेल्वेतीच चादरींचं आणि दर महिन्याने पडद्यांचं निर्जंतुकीकरण करण्यात येतं. पण, तूर्तास सावधगिरीचं पाऊल म्हणून ही सुविधाच पुरवणं बंद होणार आहे. परिणामी सर्व प्रवाशांनी गरज भासल्यास त्यांच्या स्वत:च्या चादरी आणाव्यात असं म्हणत या गैरसोयीसाठी रेल्वेकडून दिलगिरीही व्यक्त करण्यात आली आहे. 

वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार रेल्वेमध्ये ज्या बेडशीट दररोज धुवून स्वच्छ केल्या जातात ते काम अविरतपणे सुरुच राहणार आहे. पण, जादाच्या चादरीबाबत मात्र ही सतर्कता पाळण्यात येत आहे. कोरोनाविषयी एकंदरच भीतीचं वातावरण आणि स्वच्छतेचे निकष अंदाजात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.