गोव्यात कार्निव्हल रॅलीला उत्साहात सुरूवात

सुशेगाद गोव्यात पुढचे चार दिवस स्वर्ग अवतरणार आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 11, 2018, 09:11 AM IST
गोव्यात कार्निव्हल रॅलीला उत्साहात सुरूवात  title=

गोवा : सुशेगाद गोव्यात पुढचे चार दिवस स्वर्ग अवतरणार आहे.

भडक रंगातल्या गंमतशीर पोशाखात संगीतावर थिरकणारी पावलं आणि कल्पकतेचा अविष्कार असणारे चित्ररथ यांचा मिलाफ लाखो पर्यटकांनी अनुभवला.पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या उपस्थितीत मिरामार इथून  कार्निव्हल रॅलीला सुरुवात झाली. कार्निव्हल म्हणजे आनंदाचा महोत्सव. देशविदेशातील साठ गटांनी या मिरवणूकीत सहभाग घेतला. किंग मोमोचा दिलखुलास संदेश आणि कार्निव्हल  गीतांनी रॅलीत रंगत आणली.

गोव्यात कार्निव्हल 2018 महोत्सवाला सुरूवात 

यंदा प्रथमच कार्निव्हलमध्ये लहानग्या मुलांचे मोठ्या प्रमाणात सादरीकरण पहायला मिळाले. स्केटिंग, सायकलींग करत सामाजिक संदेश देत रंगीबेरंगी अवतारात अवतरलेली ही चिमुरडी आनंदाची बरसात करुन गेली. गेल्या दोन वर्षापासून सामाजिकतेला प्राथमिक देण्याची प्रथा यावर्षीच्या महोत्सवानेही जोपासली.

चित्ररथांच्यामार्फत दिला सामाजिक संदेश

बहुतांशी चित्ररथ पर्यावरण संवर्धन, पारंपारिक दर्शन, सामाजिक प्रश्नांवर मंथन अशा विषयांना वाहिलेले होते.नोटबंदी , अंमली पदार्थ, बालमजूर, पर्यावरण ऱ्हास, वृक्षतोड, रस्ता अपघात या विषयांचे भव्य चित्ररथ सहभागी झाले होते. मल्लिंगा टोपी, नानाविध आकारांचे फुगे, पताके, मिरवत चित्रविचित्र वेशभूषा केलेल्या कलाकारांनीही मिरवणुकीत रंगत आणली.