200 कोटी दान करुन पती-पत्नी होणार संन्यासी; भिक्षा मागून भरणार पोट! हा निर्णय घेण्यामागील कारण..

Bhavesh Bhai Bhandari: गुजरातच्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने आपली आयुष्यभराची कमाई दान करुन पत्नीसह संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 

आकाश नेटके | Updated: Apr 15, 2024, 09:18 AM IST
200 कोटी दान करुन पती-पत्नी होणार संन्यासी; भिक्षा मागून भरणार पोट! हा निर्णय घेण्यामागील कारण.. title=
(फोटो सौजन्य -@ bhaveshbhandari)

Bhavesh Bhai Bhandari: गुजरातच्या एका बांधकाम व्यावसायिकाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होतेय. याचं कारणंही खास आहे कारण या व्यावसायिकाने त्याच्या आयुष्याची सर्व संपत्ती दान करुन पत्नीसह संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यावसायिकाची संपत्ती ही जवळपास 200 कोटी रुपये असल्याची माहिती पुढे आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. संन्यास घेतल्यानंतर आयुष्यभर कष्ट करुन कमावलेल्या संपत्तीमधील एक रुपयाही व्यायसायिकाला जवळ ठेवता येणार नाहीये. त्यामुळे या व्यावसायिकाने सगळ्या सोई सुविधा हाताजवळ असताना असा निर्णय का घेतला याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

गुजरातमधील साबरकांठा येथे राहणारे व्यावसायिक भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नीने सर्व काही सोडून जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. भंडारी दाम्पत्याने त्यांची 200 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता दान केली आहे. भावेश भाई भंडारी, त्यांच्या पत्नीसह एकूण 35 जण साबरकांठा येथील हिम्मत नगर रिव्हर फ्रंट येथे 22 एप्रिल रोजी दीक्षा घेऊन संन्यासी होणार आहेत. त्यामुळे आता ते कोणतीही मालमत्ता, अगदी मोबाईल फोनही सोबत ठेवू शकणार नाहीत. तसेच आतापर्यंत लक्झरी लाइफ जगणारे हे जोडपे आता फॅन, कुलर, एसीशिवाय जमिनीवर झोपणार आहे. पायी प्रवास करत आणि अन्नासाठी भिक्षा मागणार आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नीची साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगरमध्ये मोठ्या थाटात मिरवणूक काढण्यात आली होती. हा प्रवास सुमारे 4 किलोमीटरचा होता. या शोभा यात्रेत भावेश भाईंनी त्यांची 200 कोटी रुपयांची सर्व संपत्ती दान केली आहे. त्यांनी अचानक दीक्षा घेण्याचे ठरवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

साबरकांठा येथील एका संपन्न कुटुंबातील भावेश भाई भंडारी यांचे आयुष्य सुखसोयी आणि ऐषोआरामात गेलं आहे. भावेश भाई भंडारी यांचा बांधकाम व्यवसाय हिम्मतनगर, अहमदाबाद आणि गुजरातमधील इतर काही शहरांमध्ये पसरला होता. भंडारी कुटुंबाचा जैन समाजाशी दीर्घकाळ संबंध आहे. भावेश भाई यांचे कुटुंब पूर्वीपासून जैन भिक्खूंशी घट्ट जोडले गेले आहेत आणि त्यांची सेवा करत आहे. भावेश भाई आणि त्यांची पत्नी यांनी जैन साधू बनून संपूर्ण आयुष्य देवपूजेत घालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी पत्नीसह आपली संपूर्ण संपत्ती दान केली आणि जैन साधू बनण्याची घोषणा केली.

मुलांनी दोन वर्षांपूर्वी घेतली दीक्षा

भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नीच्या आधी, 2022 मध्ये, त्यांचा 16 वर्षांचा मुलगा आणि 19 वर्षांच्या मुलीनेही जैन समाजात दीक्षा घेतली होती. दोन्ही भाऊ आणि बहिणीने तपस्वी जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता आणि आता त्यांचा मुलांकडून प्रेरित होऊन भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीनेही तेच करण्याचा निर्णय घेतला आहे.

जैन साधूंचे ध्यान आणि तपश्चर्या अत्यंत कठीण असते. जैन साधू कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरू शकत नाहीत. पंख्याची हवा सुद्धा ते घेत नाहीत. ते जमिनीवर चटई किंवा लाकडी फळीवर झोपतात, पायी प्रवास करतात आणि अन्नासाठी भिक्षा मागतात. भावेश भाईंच्या या निर्यणाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.