बस उलटल्याने 6 विद्यार्थ्यांचा भीषण मृत्यू; सुट्टीच्या दिवशीही सुरु होती शाळा

Haryana Accident : हरियाणामध्ये भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. शाळेची बस उलटल्याने सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर डझनभर मुलं जखमी झाले आहेत.

आकाश नेटके | Updated: Apr 11, 2024, 11:42 AM IST
बस उलटल्याने 6 विद्यार्थ्यांचा भीषण मृत्यू; सुट्टीच्या दिवशीही सुरु होती शाळा title=

Haryana Accident : हरियाणामधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना शहरात शाळेची बस उलटली आहे. गुरुवारी सकाळी एका खासगी शाळेची बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. या अपघातात सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ईद-उल-फित्रची सुट्टी जाहीर करूनही शाळा का सुरू होत्या असा प्रश्नही आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना-दादरी रोडवर कनिबा शहराजवळ हा अपघात झाला. महेंद्रगड जिल्ह्यात सुमारे 40 शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस उलटली. या अपघातात सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये एका खाजगी शाळेची बस नियंत्रणाबाहेर जाऊन आधी झाडाला धडकली आणि नंतर उलटली. दुसरीकडे डझनभर मुले गंभीर जखमी झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस उनानी गावाजवळ उलटली. ही बस जीएल पब्लिक स्कूल या खासगी शाळेची होती. दुसरीकडे सरकारी सुट्टीच्या दिवशी शाळा भरवली गेली होती आणि मुलांना आणण्यासाठी शाळेतून बस पाठवण्यात आली होती. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी शाळा भरवल्याने पालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बस चालकाने मद्यपान केले होते. दुसरीकडे, मात्र अपघाताच्या कारणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. घटनास्थळीच पाच मुलांचा मृत्यू झाला होता, तर एकाची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्या विद्यार्थ्याला व्हेंटिलेटरवर होता. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघातानंतर या घटनास्थळाचा व्हिडीओदेखील समोर आला असून त्यामध्ये बसचा चक्काचूर झाल्याचे दिसत होते. जवळच रक्ताने माखलेली मुलेही दिसत होते आणि त्यांना तातडीने उपचारासाठी पाठवले जात होते.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "जखमी विद्यार्थ्यांना महेंद्रगड आणि नारनौल येथील विविध रुग्णालयात नेण्यात आले आहे. अधिकृत कागदपत्रांनुसार बसचे फिटनेस प्रमाणपत्र सहा वर्षांपूर्वी 2018 मध्ये संपले होते. तर शिक्षण मंत्री सीमा त्रिखा यांनी सांगितले की, मी उपायुक्त आणि महेंद्रगड पोलिस अधीक्षकांना त्या हॉस्पिटलला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यास सांगितले आहे.