Wrestlers Protest ला हिंसक वळण; रात्री उशिरा जंतर मंतरमध्ये 'दंगल', नेमकं काय घडलं? पाहा...

Wrestlers Protest : एकिकडे आयपीएलच्या पर्वाची धूम सुरु असतानाच दुसरीकडे मात्र दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि दिल्ली पोलीस यांच्यात 'दंगल' झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

सायली पाटील | Updated: May 4, 2023, 07:31 AM IST
Wrestlers Protest ला हिंसक वळण; रात्री उशिरा जंतर मंतरमध्ये 'दंगल', नेमकं काय घडलं? पाहा...  title=
Jantar Mantar Clash Between Protesting Wrestlers and Delhi Police latest update

Clash Between Protesting Wrestlers and Delhi Police: मागील काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर येथे सुरु असणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला आता हिंसक वळण प्राप्त झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आणि क्रीडाविश्वाला हादरा बसला. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत काही महिला कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत होते. कुस्ती क्षेत्रातील बड्या खेळाडूंची त्यांना साथ होती. पण, हे आंदोलन चिरडत आंदोलक खेळाडूंना जंतर मंतर येथून हटवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरानं कारवाईचा पवित्रा घेतला.

आंदोलन स्थळावरून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरु केला. पण, कुस्तीपटूंनी मात्र माघार घेण्यास नकार दिला आणि इथं दोन्ही गटांमधील वाद विकोपास गेला. इतका की वादाला कुस्तीचच स्वरुप प्राप्त झालं. बऱ्याच वेळाच्या धक्काबुक्कीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतल्याची माहिती समोर आली.

पोलिसांना नडले कुस्तीपटू....

कुस्तीपटू दिवसभराच्या आंदोलनानंतर रात्रीच्या वेळी झोपण्याची तयारी करत होते. त्याचवेळी पोलीस तिथं आले आणि त्यांनी आंदोलकांसह त्यांच्या समर्थकांना हटवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी कारवाईसाठी पावलं उचलताच तिथं असणाऱ्या कुस्तीपटूंनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्या कारवाईला विरोध करण्यास सुरुवात केली. कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपानुसार त्याचवेळी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला कुस्तीपटूंना शिवीगाळ केली तर पुरुष खेळांडूना मारहाणही केल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. अद्यापही या आरोपांची खातरजमा मात्र होऊ शकलेली नाही.

हेसुद्धा वाचा : PBKS vs MI : पलटणने घेतला वानखेडेवरील पराभवाचा बदला, 6 विकेट्सने पंजाबला चारली धूळ

आम्हाला संपूर्ण देशाची साथ हवीये...

दरम्यान, कारवाई होत असतानाच तिथं असणाऱ्या माध्यमांशी संवाद साधताना कुस्तीपटू बजरंग पुनिया यानं आपल्याला संपूर्ण देशाता पाठिंबा अपेक्षित आहे असा आग्रही सूर आळवला. पोलीस आमच्याविरोधात बळाचा वापर करत आहेत, महिलांना शिवीगाळ करत आहेत, बृजभूषणविरोधात मात्र काहीही करत नाहीयेत, अशा संतप्त स्वरात त्यानं आपली बाजू मांडली.

कायदेशीर कारवाई होणारच...

एकिकडे खेळाडूंकडून पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप करत त्यांच्या कारवाईचा विरोध होत असतानाच पोलिसांकडून मात्र वेगळीच भूमिका स्पष्ट करण्यात आली. दिल्ली भागातील पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार संपूर्ण प्रकरणाबाबतची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली असून, आता इथं कायद्यानुसारच कारवाई करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आश्वासक भूमिका स्पष्ट केली.