सरकारी नोकऱ्यांचा मोह सुटेना, तुटपुंज्या पगारासाठी इंजिनिअर तरुण शिपाई होण्यासही तयार

Job News : देशातील सर्वात साक्षर असलेल्या केरळमध्ये उच्चशिक्षित तरुण सरकारी नोकरीसाठी धडपडताना दिसत आहेत. शिपाई होण्यासाठी इंजिनिअर तरुण रांग लावत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 28, 2023, 11:30 AM IST
सरकारी नोकऱ्यांचा मोह सुटेना, तुटपुंज्या पगारासाठी इंजिनिअर तरुण शिपाई होण्यासही तयार title=

Job News : देशात गेल्या काही दिवसांपासून बेरोजगारीची संकट अधिक गडद होत चाललं आहे. देशात अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरीविनाच आहेत. दुसरीकडे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक उच्चशिक्षित तरुण सातत्याने धडपड करताना दिसत असतात. अशातच केरळमधून सरकारी नोकऱ्यांबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. शिपाई पदासाठी इंजिनिअर तरुणांनी गर्दी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं.

केरळच्या एर्नाकुलम येथे शिपाई पदासाठी जागा केवळ सातवी पास इतकी पात्रता ठेवण्यात आली होती. याशिवाय उमेदवाराला सायकल कशी चालवायची हेही माहिती असणे बंधनकारक होते. मात्र शिपाई पदाच्या भरतीसाठी बी.टेक आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले तरुणही रांगेत उभे असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. अहवालानुसार, एर्नाकुलम येथे शिपाईसारख्या सरकारी पदासाठी दरमहा 23,000 रुपये पगार निश्चित करण्यात आला आहे. इतका पगार असूनही उच्चशिक्षित तरुणही मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत.

याबाबत विचारले असता बीटेक आणि ग्रॅज्युएशन केलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की ते सरकारी नोकऱ्या खूप सुरक्षित असतात. रांगेत उभ्या असलेल्या एका तरुणाने सांगितले की, सरकारी नोकरीत शिपायाची नोकरी करावी लागली तरी कोणत्याही प्रकारचा धोका नाही. सायकल हे आता वाहतुकीचे प्रमुख साधन राहिलेले नाही. तरीही शिपाई पदासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेच्या तरतुदींमधून ती काढली गेली नाही. सायकल चाचणीत सुमारे 101 उमेदवार उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांची एक प्रकारची मुलाखतही घेण्यात आली. सध्या हे लोक रँक लिस्ट येण्याची वाट पाहत आहेत.

'सुरक्षित नोकरीच सर्वात मोठी गोष्ट'

के. प्रशांत हा कोचीचा रहिवासी आहे. तोदेखील या भरतीसाठी आला होता. माध्यमांशी बोलताना प्रशांत म्हणाला की, "मी खाजगी कंपनीत रुजू झालो तरी माझा पगार 30 हजार रुपये दरमहा असेल. तसेच तिथे कोणतीही हमी नाही. मी गेल्या काही वर्षांपासून सुरक्षित नोकरीच्या शोधात आहे जिथे पगार देखील योग्य आहे. बरेच लोक इथे आले आहेत आणि मलाही परीक्षेसाठी थांबावे लागले. मात्र, महिला व दिव्यांगांना परीक्षेला बसू का दिले जात नाही, असाही प्रश्न आहे. आता दळणवळणाची साधने सायकलपुरती मर्यादित राहिली नाहीत. त्यामुळे हा एक प्रकारचा भेदभाव आहे." 

दरम्यान, सायकल चालवण्याच्या चाचणीचा कोणताही व्यावहारिक उद्देश नसला तरी, राज्य लोकसेवा आयोग आणि केरळ राज्य आर्थिक उपक्रम सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थामध्ये शिपाई पदासाठी सायकलिंग चाचण्या घेण्याचा आग्रह धरत आहे. राज्याने अद्याप जुने नियम बदललेले नाहीत, असेही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सायकल हे कार्यालयीन सहाय्यकांसाठी वाहतुकीचे साधन होते. वाहतुकीचे मार्ग बदलले असले तरी सरकारने हा नियम बदललेला नाही. महिला आणि शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांना परीक्षेतून सूट देण्यात आली आहे. 'अंतिम श्रेणीतील नोकर' अंतर्गत विविध नोकऱ्यांसाठी सायकलिंग चाचण्या अनिवार्य होत्या, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये 2022 मध्ये 5.1 लाख एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नोंदणीकृत नोकऱ्या शोधणाऱ्यांची सर्वाधिक संख्या होती. यापैकी 3.2 लाख महिला आहेत. एर्नाकुलमध्ये भरतीसाठी अनेकजण आले होते. सायकलिंगची परीक्षा संपली, परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व 101 उमेदवारांची आता सहनशक्तीची परीक्षा असणार आहे.