भाजपकडून २५० उमेदवारांची नावे निश्चित; अडवाणी, मुरली मनोहर जोशींचा पत्ता कट?

मोदी-शहा जोडगोळीच्या हातात सूत्रे गेल्यापासून पक्षातील ज्येष्ठ नेते पक्षातून बाजुला पडले आहेत.

Updated: Mar 21, 2019, 01:46 PM IST
भाजपकडून २५० उमेदवारांची नावे निश्चित; अडवाणी, मुरली मनोहर जोशींचा पत्ता कट? title=

नवी दिल्ली: भाजपकडून गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यावेळी जवळपास २५० उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून यंदा पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ मंडळींची रवानगी संसदीय मंडळात करण्यात आली होती. तेव्हापासून हे नेते पक्षातून बाजूला पडले होते. मात्र, आता भाजपकडून अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना खासदारकीचे तिकीटच नाकारले जाऊ शकते. गेल्या लोकसभा निवडणुकीत अडवाणी यांनी भोपाळमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, पक्षाने त्यांना गुजरातच्या गांधीनगरमधून लढण्याचे आदेश दिले होते.

याशिवाय, भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनीही यापूर्वीच लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा स्वराज, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी.एस. कोशियारी आणि बीसी खांडुरी, कलराज मिश्रा आणि सुमित्रा महाजन यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. 

शरद पवारांचं अनाकलनीय राजकारण भाजपच्या पथ्यावर?

तर दुसरीकडे भाजपने छत्तीसगढमध्ये एकाही विद्यमान खासदाराला तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी येथील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे हा निर्णय घेण्यात आला. १५ वर्षं सत्तेत असलेले भाजप सरकार सत्ता टिकवणार, अशी खात्री असताना पक्षाने या राज्यात सर्वाधिक मार खाल्ला होता. विधानसभेच्या ६८ जागांपैंकी केवळ १५ जागा पक्षाला जिंकता आल्या होत्या. त्यामुळे मोदींनी नव्या दमाच्या नेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. 

सुजय विखेंच्या विरोधात राष्ट्रवादीची संग्राम जगताप यांना उमेदवारी