दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : शरद पवारांचं सध्याचे राजकारण पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपा-शिवसेना युतीशी मुकाबला करायचा आहे की मदत अशी चर्चा पक्षातच सुरू झाली आहे. नगर, माढामध्ये घडलेलं राजकारण, काही मतदारसंघात दिलेले कमजोर उमेदवार यावरून राष्ट्रवादीमध्येच उलट सुलट चर्चा सुरू झालीय. तसं बघायला गेलं तर या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपा युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा सरळ सामना रंगणार आहे... अन्य छोटे पक्ष आणि आघाड्या मैदानात असल्या तरी त्यांचा सार्वत्रिक परिणाम जाणवावा, एवढी त्यांची ताकद नाही. मात्र आघाडीतला एक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस नेमका कुणाच्या टीममधून खेळतोय, हे समजेनासं झालंय.
बीडमध्ये भाजपाच्या विद्यमान खासदार प्रतिम मुंडे यांना अमरसिंह पंडित चांगली टक्कर देऊ शकतील, अशी चर्चा होती. मात्र पक्षानं त्यांचं तिकिट कापलं आणि बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली.
ठाण्यातही हेच घडलं... नवी मुंबईतले बडे नेते गणेश नाईक विद्यमान खासदार राजन विचारेंना आव्हान देऊ शकतील, असं मानलं जात होतं. मात्र गेली पाच वर्षं गायब असलेल्या आनंद परांजपेंना तिकिट मिळालं. २०१४ च्या निवडणुकीत आनंद परांजपेंनी कल्याणमधून निवडणूक लढवली होती.
माढ्यातून शरद पवारांनी माघार घेतल्यानंतर मोहिते-पाटील घराण्यात उमेदवारी द्यायला स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यांची समजूत घालण्यासाठी पवारांनी काहीही केलं नाही. अखेर रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपाची वाट घरली.
दिंडोरीही त्याच मार्गावर आहे. राष्ट्रवादीमधून तिकिट मिळण्याची शक्यता नसल्यानं ए.टी. पवार यांच्या कन्या भारती भाजपाच्या वाटेवर आहेत.
अहमदनगरच्या जागेवरून पवारांनीच काँग्रेसची अडचण केली. सुजय विखेंसाठी जागा सोडणं शक्य असतानाही सोडली नाही. अखेर सुजय विखे-पाटीलही भाजपावासी झाले. त्यामुळे आघाडीनं हातची एक जागा जवळजवळ गमावल्यात जमा आहे.
याशिवाय काही मतदारसंघातील उमेदवारांवरून राष्ट्रवादीमध्ये अद्यापही गोंधळ सुरू आहे. काही जागांच्या अदला-बदलीवरूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील घोळ मिटायला तयार नाही.
नरेंद्र मोदींना सत्तेवरून खाली खेचण्याची भाषा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत शरद पवारांचे सध्या सुरू असलेले राजकारण भाजपालाच फायदेशीर ठरणारे असल्याची चर्चा राष्ट्रवादीतच सुरू आहे. मात्र पवारांचे हे राजकारण कुणाच्या पथ्यावर पडणार? हे उघड होण्यासाठी निवडणूक निकालापर्यंत वाट पहाव लागेल.