भारतापेक्षा परदेशात अधिक भारतीय कोरोनाग्रस्त

पाहा, भारताबाहेर किती भारतीय कोरोनाग्रस्त...

Updated: Mar 18, 2020, 05:46 PM IST
भारतापेक्षा परदेशात अधिक भारतीय कोरोनाग्रस्त title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांची संख्या १४७ पर्यंत पोहचली असली, तरी यापेक्षा भारताबाहेर अधिक भारतीय कोरोनाग्रस्त आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लोकसभेत ही माहिती दिली. भारताबाहेर एकूण २७६ भारतीय कोरोनाबाधित आहेत. त्यामध्ये सर्वाधिक इराणमध्ये आहेत. इराणमध्ये २५५ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांनी ही आकडेवारी लोकसभेत दिली.

इराणमध्ये सर्वाधिक २५५ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये १२ आणि इटलीमध्ये ५ भारतीय कोरोनाग्रस्त आहेत. या तीन देशांव्यतिरिक्त श्रीलंकेत दोन भारतीय कोरोनाग्रस्त आहे. याशिवाय हाँगकाँग, कुवेत आणि रवांडा या देशांत प्रत्येकी एक भारतीय कोरोनाबाधित आहे. 

परदेशात कोरोनाग्रस्त असलेल्या भारतीय रुग्णांना भारतात उपचारांसाठी आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहितीही परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी दिली.

लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी सांगितलं की, भारतानं केवळ देशातच कोरोना रोखण्याची मोहीम चालवली नाही तर शेजारी देशातही कोरोना रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न केले आहेत. चीनसह अन्य देशांना वैद्यकीय साहित्यासह अन्य मदतही भारत सरकारनं केल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.

इराणमधील भारतीयांच्या सँम्पलची भारतात चाचणी

भारतानं इराणमध्ये एक लॅब बनवली असून त्याद्वारे भारतीयांचे सँम्पल भारतात आणले जात असून त्यांची चाचणी केली जात आहे. चाचणीमध्ये ज्यांचे सँम्पल निगेटिव्ह येतात त्यांना योग्य पद्धतीनं भारतात आणण्यात येत आहे, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. इटलीमध्येही डॉक्टरांची टीम पाठवली असून तशीच प्रक्रिया इटलीतही अवलंबली जात आहे. इराण आणि इटलीमध्ये सर्वाधिक भारतीय प्रभावित असून या दोन देशांत परिस्थिती फारच गंभीर असल्यानं तिथं अधिक लक्ष दिलं जात आहे.

भारतात इतके रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त

भारतात १४७ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यात १२२ भारतीय आणि २५ विदेशी नागरिक आहेत. भारतात कोरोनाबाधित ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून १४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.