मेघालयात कोनराड संगमा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

नॅशनल पिपुल्स पार्टीचे अध्यक्ष कोनराड संगमा यांनी मंगळवारी मेघालयाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Updated: Mar 6, 2018, 03:48 PM IST
मेघालयात कोनराड संगमा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ title=

शिलांग : नॅशनल पिपुल्स पार्टीचे अध्यक्ष कोनराड संगमा यांनी मंगळवारी मेघालयाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मेघालयाचे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. मेघालयात पाच पक्ष आणि एका अपक्षाच्या समर्थनाने एनडीएचं सरकार सत्तेवर बसलं. 

भाजपने रचला इतिहास - राजनाथ सिंह

कोनराड संगमा यांच्या शपथविधीसाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि कॉंग्रेसवर टीका केली. एएनआयसोबत बोलताना ते म्हणाले की, लोकांना आधी असं वाटत होतं की, नॉर्थ-इस्ट राज्यांमध्ये केवळ कॉंग्रेसच राज्य करू शकते. पण भाजपने हे बदलून इतिहास रचला आहे. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह हे सुद्धा उपस्थित होते. 

कोनराड संगमा काय म्हणाले?

संगमा यांनी सोमवारी राज्यपाल गंगा प्रसाद यांची भेट घेतली होती आणि ६० सदस्यीय विधानसभेत ३४ आमदारांच्या समर्थनात सत्ता स्थापनेचा दावा केला होता. बैठकीत संगमा म्हणाले होते की, आम्ही राज्यपालांची भेट घेतली आणि ३४ आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर केलं. ज्यातील १९ आमदार एनपीपीचे, ६ यूनायटेड डेमोक्रेटीक फ्रन्टचे, ४ पिपुल्स डेमोक्रेटीक पार्टीचे, २ हिल स्टेट डेमोक्रेटीक पार्टीचे, २ भाजपचे आणि एक अपक्ष आहेत.