पेट्रोल-डिझेलचे भाव लागोपाठ तिसऱ्या दिवशी वाढले

सौदी अरामकोवर ड्रोनने झालेल्या हल्ल्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही झाला आहे.

Updated: Sep 19, 2019, 10:05 AM IST
पेट्रोल-डिझेलचे भाव लागोपाठ तिसऱ्या दिवशी वाढले title=

मुंबई : सौदी अरामकोवर ड्रोनने झालेल्या हल्ल्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवरही झाला आहे. लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. पेट्रोल २९ पैसे प्रती लीटर आणि डिझेल १९ पैसे प्रती लीटरने वाढलं आहे. याआधी मंगळवारी पेट्रोल २४ पैशांनी आणि डिझेल २५ पैशांनी वाढलं होतं.

इंधनाचे दर वाढल्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचे भाव ७८.३९ रुपये आणि डिझेलचे भाव ६९.२३ पैसे झाले आहेत. तर दिल्लीमध्ये पेट्रोल ७२.७१ रुपये आणि डिझेल ६६.०१ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोल ७५.४३ रुपये, डिझेल ६८.४२ रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल ७५.५७ रुपये तर डिझेल ६९.७९ रुपये प्रती लीटर आहे.

सौदी अरामकोच्या दोन प्लांटवर ड्रोन हल्ला झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या उत्पादनात कमतरता आली आहे, त्यामुळे ही भाववाढ झाली आहे. मागच्या तीन दिवसात पेट्रोल ६८ पैसे आणि डिझेल ५८ पैशांनी वाढलं आहे.

येत्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या भावात १० डॉलरनी वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी ब्रेंट क्रुडचा भाव ६२.७१ डॉलर प्रती बॅरल आणि डब्ल्यूटीआय क्रुडचा भाव ५८.२० डॉलर प्रती बॅरल आहे.