'कठोर निर्णय घेणं ही काळाची गरज'

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'मन की बात'मधून जनतेशी संवाद...

Updated: Mar 29, 2020, 12:08 PM IST
'कठोर निर्णय घेणं ही काळाची गरज' title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. मोदींनी 'मन की बात'मध्ये सुरुवातीलाच देशवासियांची माफी मागत असल्याचं सांगितलं. काही कठोर निर्णय घ्यावे लागले, ज्यामुळे अनेकांना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. काही लोक माझ्यावर नाराज असतील. मी तुमची समस्या समजू शकतो. परंतु कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं त्यांनी सांगितलं.

'जगभरातील परिस्थिती पाहता हाच एक पर्याय आहे. या निर्णयामुळे सामोरं जावं लागत असलेल्या कठीण परिस्थितीसाठी माफी मागतो. मात्र नंतर रोग असाध्य होतात. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला घेरा घातला आहे. प्रत्येकाला हा व्हायरस आव्हान देत आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र येत कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे.' असं मोदींनी सांगितलं. कोरोनाविरोधात सुरु असलेल्या लढ्यात अहोरात्र काम करणाऱ्या, पोलीस, नर्स, डॉक्टरांचेही मोदींनी आभार मानले आहेत.

मोदींनी 'हा लॉकडाऊन सर्वांना वाचवण्यासाठी केला आहे. तुम्हाला स्वत:ला वाचवायचं आहे. तुमच्या कुटुंबाला वाचवायचं आहे. कोणालाही कायदे,नियम मोडण्याची ईच्छा नाही, परंतु काही लोक या नियमांचं पालन करत नाही. जगभरातील अशाप्रकारे नियमांचं पालन न करणारे लोक आज पश्चाताप करत आहेत. जगात सर्व सुखांचं साधन आपलं आरोग्य आहे. मात्र काही लोक नियम मोडून आपल्या आरोग्याशी, जीवाशी खेळ करत आहेत' असं ते म्हणाले.

'मन की बात'दरम्यान मोदींनी कोरोनाशी यशस्वी लढा देणाऱ्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या राम यांच्याशी संवाद साधला. लंडनहून भारतात परतलेल्या राम यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र राम यांनी डॉक्टरांनी, प्रशासनाने सांगितलेल्या प्रत्येक नियमाचं योग्य पालन करत आज ते पूर्णपणे स्वस्थ आहेत.

मोदींनी पुण्यातील डॉक्टर बोरसे यांच्याचीशी संवाद साधला. डॉक्टर बोरसे यांनी, कोरोना संशयितांनी घरीच राहावं. त्यांनी सतत हात धुवावेत, सॅनिटायझर नसल्यास साबणाने हात धुतले तरी योग्य असल्याचे ते म्हणाले. खोकला, सर्दी झाल्यास तोंडावर रुमाल ठेवणं आवश्यक आहे. कोरोनाविरोधात आपण यशस्वी लढाई जिंकणार असल्याचा विश्वास डॉक्टर बोसरे यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींनी, अशा काही घटनांबाबत सांगतिलं की, काही लोक विदेशातून आलेल्या आणि 14 दिवस घरात क्वारंटाईन असलेल्या लोकांना वाईट वागणूक दिली जात आहे. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. मोदींनी, 'हे लोक अपराधी नाहीत. ते या व्हायरसमुळे कोणी संक्रमित होऊ नये यासाठी क्वारंटाईन आहेत. अशा लोकांसोबत केवळ सोशल डिस्टंसिंग करणं गरजेचं आहे. त्यांना वाईट वागणून देणं चुकीचं' असल्याचं मोदींनी सांगितलं.