पंतप्रधान मोदींचे लाल किल्ल्यावरून या कार्यकाळातील शेवटचे भाषण उद्या

स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावरुन बोलताना, आयुषमान भारत योजनेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Updated: Aug 14, 2018, 03:58 PM IST
पंतप्रधान मोदींचे लाल किल्ल्यावरून या कार्यकाळातील शेवटचे भाषण उद्या title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उद्या ( बुधवार,१५ ऑगस्ट) लाल किल्ल्यावरुन होणारं भाषण हे त्यांचं या कार्यकाळातील शेवटचं भाषण असणार आहे. त्यामुळं आपल्या कार्यकाळातील शेवटच्या भाषणात नरेंद्र मोदी काय बोलणार याबाबत देशभरात उत्सुकता आहे.

आयुषमान भारत योजनेची घोषणा?

स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावरुन बोलताना, आयुषमान भारत योजनेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेचा देशभरातल्या १० कोटींहून अधिक गरीबांना लाभ मिळू शकणार आहे. या योजनेंतर्गत एका कुटुंबाला वर्षाला ५ लाखांपर्यंतची वैद्यकीय मदत मिळू शकेल. पहिल्या टप्प्यात ही योजना देशातल्या काही निवडक राज्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प स्वरुपात राबवली जाईल. त्यानंतर पंतप्रधान मोदींची ही महत्त्वाकांक्षी योजना देशभरात सप्टेंबरपासून राबवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. देशातल्या गरीब, उपेक्षित घटकाला वैद्यकीय कवच उपलब्ध करुन देणं, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

मोदींचे भाषण, देशवासियांचे आकर्षण

पुढच्या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरून होणारे नरेंद्र मोदींचे भाषण हे सर्वांच्या आकर्षणाचा बिदू असणार आहे यात काहीच शंका नाही.