१९८४ च्या शीख दंगलीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी वादात

इंदिरा गांधी यांची त्यांच्याच एका शीख अंगरक्षकाकडून हत्या झाल्यानंतर १९८४ मध्ये उसळलेल्या दंगलीत ३००० शिख ठार झाले होते

Updated: Aug 25, 2018, 04:52 PM IST
१९८४ च्या शीख दंगलीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी वादात title=

लंडन : ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स' परिसरात शुक्रवारी झालेल्या 'भारत आणि विश्व' नावाच्या एका परिचर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या १९८४ च्या शीख दंगलीसंबंधी केलेल्या एका वक्तव्यावरून ते वादात सापडले आहेत. १९८४ साली शिखविरोधी उसळलेल्या दंगलीत काँगेस पक्षाचा 'हात' असल्याबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ही घटना 'दुर्घटना' आणि 'त्रासदायक अनुभव' असल्याचं सांगितलं... परंतु, यामध्ये काँग्रेसचा सहभाग असल्याचं मात्र त्यांनी फेटाळून लावलं... माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच एका शीख अंगरक्षकाकडून हत्या झाल्यानंतर १९८४ मध्ये उसळलेल्या दंगलीत ३००० शिख ठार झाले होते. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. 

१९८४ मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत हिंसाचार करणाऱ्यांना शिक्षा देण्याचं त्यांनी '१०० टक्के' समर्थन केलं. त्यांनी म्हटलं, 'मला वाटतं कोणत्याही प्रकारची हिंसा ही चुकीचीच आहे. भारतात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. परंतु, माझ्या मताप्रमाणे कोणत्याही चुकीची शिक्षा त्या आरोपीला मिळायला हवी... आणि मी त्याचं १०० टक्के समर्थन करतो'

शीख दंगल ही 'दुर्घटना' आणि 'त्रासदायक अनुभव' होता, याबद्दल माझ्या मनात शंका नाही... तुम्ही म्हणता त्यात काँग्रेसचाही सहभाग होता, मी यावर सहमत नाही. निश्चित रुपात हिंसा झाली होती... आणि निश्चित रुपात ती दुर्घटना होती, असंही त्यांनी म्हटलंय. 

जेव्हा त्यांनी शिखविरोधी दंग्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी म्हटलं, 'जेव्हा मनमोहन सिंह यांनी यावर भाष्य केलं तेव्हा ते त्यांनी आम्हा सर्वांच्या वतीनं केलं होतं. मीदेखील एक हिंसा पीडित आहे... आणि तेव्हा तुम्हाला कसं वाटतं हे मी जवळून अनुभवलंय'... यावेळी ते १९९१ मध्ये 'लिट्टे'द्वारे त्यांचे पिता आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येबद्दल बोलत होते. 

अधिक वाचा - १९८४ च्या दंगलीसाठी राहुल गांधींना जबाबदार धरू नका - पी. चिंदबरम

'मी त्या लोकांना मरताना पाहिलंय ज्यांच्यावर मी खूप प्रेम करत होतो. मी त्या व्यक्तीलाही मरताना पाहिलंय ज्यानं माझ्या वडिलांची हत्या केली होती (प्रभाकरण)... जेव्हा मी जाफनाच्या (श्रीलंका) तटावर प्रभाकरनला मृत पाहिलं तेव्हाही मला दु:ख झालं. कारण मी त्याला माझ्या पित्याच्या जागी पाहत होतो आणि त्याच्या मुलांच्या जागी स्वत:ला... त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वत: हिंसा पीडित असता तेव्हा तुम्हाला त्याची झळ पोहचलेली असते... त्याचा परिणाम तुमच्यावर दिसतो' असंही यावेळी त्यांनी म्हटलंय.