गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्येचा तपास एकाच 'एसआयटी'कडे

एम एम कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे एकमेकांशी जुळल्याचा आरोप

Updated: Feb 26, 2019, 03:40 PM IST
गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्येचा तपास एकाच 'एसआयटी'कडे  title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश या दोन्ही हत्या प्रकरणाची चौकशी एकाच एसआयटीकडे सोपवलीय. यापुढे गौरी लंकेश हत्या प्रकरणाची चौकशी करणारी एसआयटीच कलबुर्गी यांच्याही हत्येचा तपास करणार आहे. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास आत्तापर्यंत कर्नाटक सीआयडी करत होती. कर्नाटक हायकोर्टाची धारवाड खंडपीठाची या चौकशीवर करडी नजर असेल. यापुर्वी सर्वोच्च न्यायालयानं एनआयए, सीबीआय या चौकशी समित्या तसंच महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला नोटीस जारी करून सहा आठवड्यात उत्तर मागितलं होतं. 

कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी कलबुर्गी यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या पतीच्या हत्येची चौकशी विशेष समितीकडून करण्यासाठी याचिका दाखल केली होती. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत योग्यरितीनं चौकशी झालेली नसल्याचा आरोप उमादेवी यांनी केला होता. एम एम कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे एकमेकांशी जुळले असल्याचं उमादेवी कलबुर्गी यांनी म्हटलंय.

हम्पी विद्यापीठाचे माजी कुलपती आणि विचारवंत कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट २०१५ रोजी कर्नाटकच्या धारवाडमध्ये त्यांच्या राहत्या घरी गोळी मारून हत्या केली होती. मृत्यूसमयी ते ७७ वर्षांचे होते. तर दाभोलकर यांची ऑगस्ट २०१३ मध्ये आणि गोविंद पानसरे यांची फेब्रुवारी २०१५ मध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणांचं गूढ उकलण्यात चौकशी यंत्रणांना आत्तापर्यंत यश आलेलं नाही.