IFSC गुजरातमध्ये गेले तर मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखू; शिवसेना खासदाराचा इशारा

खासदार राहुल शेवाळे यांचा केंद्र सरकारला थेट इशारा

Updated: May 2, 2020, 03:30 PM IST
IFSC गुजरातमध्ये गेले तर मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखू; शिवसेना खासदाराचा इशारा title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी)  गांधीनगर, गुजरात येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी थेट केंद्र सरकारला इशारा दिला आहे. दरवर्षी एकट्या मुंबईकडून केंद्राकडे जमा होणारा सुमारे 40 टक्के कर, गांधीनगर इथूनच वसूल करावा, असा सल्लाही खासदार शेवाळे यांनी केंद्राला दिला आहे.

'केंद्र सरकारने मुंबईच्या आकसापोटी आणि गुजरातवरील प्रेमापोटी मूळ निर्णयात फेरफार करून 'आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र' गांधींनगर, गुजरात येथे हलविण्याचा घेतलेला निर्णय आक्षेपार्ह आहे. आयएफएससी मुंबईबाहेर गेल्यास, मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. (IFSC हवं असेल तर, श्वेतपत्रिका काढा- सुधीर मुनगंटीवार) 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांसह अनेक महत्वाच्या आर्थिक संस्था मुंबईत आहेत. त्यामुळे जगभरातील आर्थिक घडामोडींशी ताळमेळ साधणारे, ' आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र' मुंबईतच असावे, असा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील जागाही निश्चित करण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारने ही जागा मेट्रो रेल्वेसाठी आरक्षित करून आयएफएससी मुंबईत उभारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिकूल परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप याआधीही, खासदार शेवाळे यांनी लोकसभेत केला होता. (IFSC केंद्र मुंबईतून गुजरातला नेण्याचा निर्णय केंद्राने परस्पर घेतला- सुभाष देसाई)

दरवर्षी मुंबईतून केंद्राला सुमारे पावणे दोन लाख कोटींचा कर दिला जातो. तसेच देशभरातील 90 टक्के व्यापारी बँकिंग, 80 टक्के म्युच्युअल फंड ची नोंदणी मुंबईतुन होते. या सर्व बाबींचा विचार करता, आयएफएससी मुंबईबाहेर नेल्यास, केंद्र सरकारला या अन्यायकारक निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे.