Jammu Kashmir : दहशतवाद्यांचा रक्तरंजित खेळ सुरूच, बिगर काश्मिरी नागरिक निशाण्यावर

दहशतवाद्यांचा रक्तरंजित खेळ कधी थांबणार? नागरिकांना जीव मुठीत घेवून जगावं लागतंय 

Updated: Oct 17, 2021, 08:11 AM IST
Jammu Kashmir : दहशतवाद्यांचा रक्तरंजित खेळ सुरूच, बिगर काश्मिरी नागरिक निशाण्यावर  title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा रक्तरंजित खेळ सुरूच आहे. लष्कराच्या कारवाईमुळे चक्रावून गेलेल्या दहशतवाद्यांकडून नागरिक, बिगर काश्मिरी नागरिक आणि विशेषतः हिंदूंना लक्ष्य केलं जात आहे. शनिवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सामान्य लोकांवर गोळीबार केला. श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्य़ांत शनिवारी दहशतवाद्यांनी परप्रांतीय नागरिकांची गोळ्या घालून हत्या केली.  यामध्ये रस्त्यावर पाणीपुरी विकणारे एक सामान्य दुकानदार, औषधाचे दुकान चालवणारे काश्मिरी पंडित, शाळेत शिकवणारे शिक्षक आणि लाकूडकाम करणाऱ्या एक सुताराची दहशदवाद्यांनी हत्या केली.

श्रीनगरमधील ईदगाह भागात दहशतवाद्यांनी बिहारमधील रहिवासी अरविंद कुमार यांची गोळ्या घालून हत्या केली. अरविंद कुमार  पाणीपुरी विकून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करायचे.  अरविंद यांच्या डोक्यात गोळी झाडल्यानंतर दहशतवादी फरार झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयातही नेण्यात आले, परंतु रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अरविंदचे कुटुंब बिहारमधील बांका येथे राहते. अरविंद आई-वडील आणि 3 भाऊ यांना सोडून, ​​श्रीनगरमध्ये एका भावासोबत कामाच्या शोधात आले होते, पण दहशतवाद्यांनी 22 वर्षीय पाणीपुरी विक्रेत्याची हत्या केली. त्यामुळे काश्मीरमधील नागरीक आता स्वतःचा जीव मुठीत घेवून जगत आहेत. 

यापूर्वी श्रीनगरच्या लालबाग भागात वीरेंद्र पासवान पाणीपुरी विक्रेताची हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी काश्मीरमधील सर्वात प्रसिद्ध फार्मासिस्ट मखनलाल बिंद्रू यांची दुकानात गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापक सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची ईदगाह परिसरातचं हत्या करण्यात आली. अधिकृत आकडेवारीनुसार 2021 मध्ये दहशतवाद्यांनी आतापर्यंत एकूण 30 नागरिकांचा बळी घेतला आहे.