डॉक्टर होण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं पण शेवटी.... बारावीच्या विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू

HSC Exam : कॉलेजमध्ये हुशार असलेल्या तेजस्विनीचे विज्ञान शाखेतून शिकणाऱ्या डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. बारावीच्या परीक्षांचे तीन पेपरही तिने दिले होते. मात्र त्या स्वप्न पूर्ण होण्याआधीच तेजस्विनीला मृत्येने गाठलं आहे  

Updated: Mar 7, 2023, 11:49 AM IST
डॉक्टर होण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं पण शेवटी.... बारावीच्या विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू title=

Ahmednagar News : राज्यात सध्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSC) परीक्षा सुरु आहेत. परीक्षेची पूर्ण तयारी करुन विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी जात आहेत. मात्र डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून बारावीची परीक्षा (12th board) देणाऱ्या एका विद्यार्थिनीचा अहमदनगरमध्ये (ahmednagar) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात परीक्षा देण्याच्या आधी विद्यार्थीनी आणि तिच्या आजोबांनी शिळे अन्न खाल्ले होते. यानंतर दोघांनाही त्रास सुरु झाला. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगरच्या राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. या दुर्दैवी घटनेत बाभळेश्वर येथील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तेजस्विनी मनोज दिघे या विद्यार्थिनीचा सोमवारी अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. तर तिचे आजोबा बिमराज दिघे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिमराज हे रयतचे माजी मुख्याध्याक आहेत. गेल्या आठवड्यात बुधवारी हा सर्व प्रकार घडला होता. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र यामध्ये तेजस्विनीचा मृत्यू झाला तर आजोबांचा जीव वाचला आहे.

नेमकं काय झालं?

तेजस्विनी प्रवरानगरच्या  एम. जी. कॉलेजमध्ये बारावीची परीक्षा देण्यासाठी जात होती. तिने इंग्रजी आणि भौतिकशास्त्रचा पेपर दिला होता. बुधवारी रसायनशास्त्राच्या तिसऱ्या पेपर आधी तेजस्विनी आणि तिच्या आजोबांनी रात्रीचे शिळे इडली- सांबर खाल्ले होते. त्यानंतर दोघांनाही पोटाचा त्रास सुरु झाला. त्यानंतर लोणी येथील पीएमटी दवाखान्यात त्यांना दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्यांना संगमनेरला हलवण्यात आले. मात्र नेमकं काय झालंय याचे निदान होत नसल्याने दिघे कुटुंबियांनी त्यांना पुण्याच्या केम हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र सोमवारी दुपारी तेजस्विनीचा मृत्यू झाला.

दुसरीकडे बिमराज दिघे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपाचर सुरु असून दोन दिवसांनी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. फुड पॉयझयनिंगमुळे हा सर्व प्रकार झाल्याचे समोर आले आहे. तेजस्विनी ही विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेत होती. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र आकस्कित मृत्यूमुळे तेजस्विनीचे हे स्वप्न अपूर्णच राहिलं आहे. तेजस्विनीच्या अचानक निघून जाण्याने दिघे कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.