रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर 'वंचित' आघाडीमधून बाहेर

वंचित आघाडीला मोठा धक्का

Updated: Jan 14, 2020, 04:41 PM IST
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर 'वंचित' आघाडीमधून बाहेर title=

औरंगाबाद : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी वंचित आघाडीपासून वेगळे होतं असल्याचं औरंगाबादेत स्पष्ट केलं आहे. आम्ही वंचितला त्यावेळी पाठिंबा दिला होता, मात्र वंचितला यश आलं नाही. त्यामुळं आंबेडकरी समाजामध्ये नैराश्य निर्माण झालं असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आंबेडकरी समाजाला पुन्हा एकदा गोळा करून त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे. काही वर्षात पुन्हा रिपब्लिकन सेना आंबेडकरी लोकांसाठी जोरात काम करेल, असंही आनंदराज आंबेडकर म्हणाले आहेत. 

आंबेडकरी चळवळ पायावर उभी रहावी म्हणून आम्ही वंचितला पाठिंबा दिला होता, आता फक्त रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही जनतेसाठी काम करून सत्तेपर्यंत पोहोचू, असं आंबेडकरांनी सांगितलं आहे. गटातटाना एकत्र कऱणं शक्य नाही, मात्र जमेल तेवढ्यांना आमच्या सेनेत आणून आम्ही ऐक्य करू आणि येणा-या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत आम्ही आमच्या बळावर उमेदवार उभे करू असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

वंचित आघाडीमध्ये जे इतर घटक सोबत आले होते त्यांचे मतदान त्यांना मिळाले नाही. म्हणून ही वेळ आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. आनंदराज आंबेडकर वेगळे झाल्याने वंचित आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर विरुद्ध आनंदराज आंबेडकर अशी लढत होण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगली मतं मिळाली होती. पण विधानसभा निवडणुकीत एमआयएम बाहेर पडला. त्यानंतर त्यांना विधानसभा निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही. आता आनंदराज आंबेडकरांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे वंचित आघाडीला आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.