शाह- ठाकरे भेट रद्द होण्याची शक्यता; युती होणार की नाही?

युतीचा तिढा सुटेना

Updated: Sep 21, 2019, 10:24 PM IST
शाह- ठाकरे भेट रद्द होण्याची शक्यता; युती होणार की नाही?  title=

मुंबई : शनिवारी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या. निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर याचे थेट पडसाद राजकीय पटलावर पाहायला मिळाले आणि एकाच प्रश्नाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं. तो प्रश्न म्हणजे शिवसेना- भाजप युतीचं काय? 

अमित शाह रविवारी म्हणजेच, २२ सप्टेंबरला मुंबईत येणार आहेत. पण, त्यांच्या या दौऱ्यात त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याविषयी कोणतीच स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तूर्तास रविवारी सेना- भाजप युतीची घोषणा होणार नाही असंच चित्र समोर आलं आहे. 

शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या रुपरेषेनुसार त्यांचे काही कार्यक्रम ठरलेले आहेत. ज्यामध्ये भाषण, मेगा भरती आणि त्यानंतर राजभवनात विश्रांती असे एकंदर कार्यक्रम असल्याचं कळत आहे. यामध्ये कुठेच ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चिन्ह नाहीत. त्यामुळे ही भेटच झाली नाही तर, पुन्हा एकदा युतीचा हा तिढा नेमका सुटणार तरी कधी असाच प्रश्न पुढे येत आहे. 

युती होणार की नाही? उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट

एकिकडे कोणत्या मतदार संघात किती जागांवर कोणते उमेदवार उभे करायचे, त्यासाठीची आकडेवारी नेमकी कशी असेल अशी गणितं सुरु असतानाच आता दुसरीकडे युती तुटणार का, असा प्रश्नही डोकं वर काढू लागला आहे. त्यामुळे आता निवडणुकांच्या तारखांची उत्सुकता शमली आणि युतीचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, असं चित्र समोर येत आहे.