पोलीस बळाचा वापर करु नका, तात्काळ बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण थांबवा - अजित पवार

 Ajit Pawar on Barsu refinery Survey : बारसू रिफायनरी आंदोलनावर ग्रामस्थ ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2023, 12:28 PM IST
 पोलीस बळाचा वापर करु नका, तात्काळ बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण थांबवा - अजित पवार  title=

Ajit Pawar On Barsu refinery survey : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करुन मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि त्यावर मार्ग काढावा. पोलीस बळाचा वापर करुन दंडुकेशाहीने सर्वेक्षण करु नका, अशी आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत सरकारकडे मागणी केली आहे. 

बारसू रिफायनरी होणार की नाही, हे सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल - उदय सामंत

रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. नवी मुंबईतील खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलीस बळाचा वापर कराल तर बारसू प्रकरण आपणास महागात पडेल, असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. स्थानिकांचा विरोध असताना बारसू प्रकल्प आणण्याचा कशासाठी घाट घातला जात आहे. यात कोणाचा स्वार्थ आहे. कोणासाठी हा प्रकल्प आणला जात आहे, असा सवाल शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केलेत.

कोकणतील शेतकऱ्यांनी नाणार प्रकल्प हाकलून लावला आहे. आता बारसू प्रकल्प आणण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकल्प आणण्यामागे कोणाचा स्वार्थ आहे. महिला आणि मुलं रस्त्यावर उतरले असताना त्यांच्यावर लाठी हल्ला करण्याचा भ्याड प्रकार कशासाठी? पत्रकारांसमोर कारवाई करणे आवश्यक होते. ज्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर तो प्रकल्प नको. कोणाची तरी सुपारी घेऊन लोकांच्या जमिनी हडप करणे योग्य नाही. मी मुख्यमंत्र्यांना इशारा देत आहे, हे प्रकरण तुम्हाला महागात पडेल, असे राजू शेट्टी म्हणाले.

आज दुसऱ्या दिवशी बारसू - सोलगाव रिफायनरीला (Barsu Refinery Project Protest) स्थानिकांनी तीव्र विरोध केला. गोळ्या झाडा, खून करा, आम्ही हटणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला होता. मात्र यासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येने बारसू गावात आले होते. मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली. यावेळी आंदोलनकांना पोलिसांनी आवाहन केले. घरी निघून जा म्हणून सांगितले. मात्र, ते न ऐकल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रत्नागिरीच्या दिशेने घेऊन गेलेत. त्यामुळे हे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.