Video: '...तर आपण कार्यक्रम करुन टाकतो'; विधानभवनाच्या गेटवर CM शिंदेंचं हातवारे करत विधान

CM Eknath Shinde Viral Video: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा संपूर्ण संवाद विधानसभेच्या पायऱ्यांवरच घडल्याचं पाहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 26, 2024, 01:44 PM IST
Video: '...तर आपण कार्यक्रम करुन टाकतो'; विधानभवनाच्या गेटवर CM शिंदेंचं हातवारे करत विधान title=
दोन्ही नेत्यांमध्ये विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ संवाद

CM Eknath Shinde Viral Video: राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन वातावरण तापलेलं असतानाच आजपासून (26 फेब्रुवारी) विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आज विधानपरिषदेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरु झाले तर विधानसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता सुरू झालं. 5 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. सभागृहाच्या कामकाजामध्ये पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. दरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंदरम्यानच्या संवादाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

दोघे भेटले आणि नानांनी तो प्रश्न विचारला

नाना पटोले आणि मुख्यमंत्र्यांची प्रवेशद्वाराजवळ भेट झाली. दोन्ही नेते एकमेकांशी हस्तांदोलन करताना व्हिडीओत दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे एका हाताने चष्मा सरळ करत असतानाचा नाना पटोले, 'हे काय चाललंय? तुम्हीच त्यांना मोठं केलंय,' असं म्हणत शिंदेंना प्रश्न विचारतात. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी हातवारे करुन उत्तर देताना दिसत आहेत.

हातवारे करत मुख्यमंत्र्यांचं उत्तर

नाना पटोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे, 'ते सामान्य कार्यकर्ते होते तोवर ठीक होतं आता नाही. आपल्या लिमीटच्या बाहेर गेलं तर आपण कार्यक्रम करुन टाकतो,' असं अगदी हातवारे करुन सांगतात. मात्र या दोघांमधील हा संवाद नेमका कोणाबद्दल आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तरी पत्रकारांच्या गराड्यात अडकण्याआधी विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही नेत्यांमध्ये झालेला हा संवाद व्हिडीओमध्ये अगदी स्पष्टपणे ऐकू येत आहे. यानंतरही नाना पटोले आणि मुख्यमंत्री शिंदे एकमेकांशी हसून काहीतरी बोलतात. मात्र व्हिडीओमध्ये त्यांच्या संवादामधील शेवटची काही वाक्य स्पष्टपणे ऐकू येत नाहीत. तरी या दोघांमधील ही चर्चा नेमकी कोणाबद्दल होती याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

यंदा हे मुद्दे गाजणार

दरम्यान, हे अधिवेशन मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे वादळी ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्नात असून, या पार्श्वभूमीवर मराठा कुणबी समाजाच्या सगेसोयरे व्याख्येच्या अधिसूचनेविषयी सरकार काय निर्णय घेणार? याबाबतची उत्सुकता कायम आहे.  मराठा आरक्षण प्रश्नाबरोबरच कल्याणधील पोलीस ठाण्यात गोळीबार, मुंबईतील लोकप्रतिनिधीची हत्या, राज्यात ढासळलेली कायदा सुव्यवस्था, पुण्यात सापडलेले 4000 कोटींचे ड्रग्ज, कांदा निर्यात बंदी, निवासी डॉक्टरांचा संप यासारख्या विषयांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येणार आहेत.