दर नियंत्रणासाठी कांदा आयातीचा निर्णय

कांद्याचे दर चढेच...

Updated: Nov 15, 2019, 01:25 PM IST
दर नियंत्रणासाठी कांदा आयातीचा निर्णय title=
संग्रहित फोटो

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : कांद्याचे दर कमी करण्यासाठी, आतापर्यंत केलेले अनेक उपाय यशस्वी होत नसल्यामुळे कांद्याचे दर चढेच आहेत. दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने कांद्याची आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र याचाही किती उपयोग होईल, याबाबत शंकाच आहे.

पोळ कांदा आणि उन्हाळ कांद्याच्या हंगामामध्ये मोठं अंतर असल्यामुळे उत्पादनात मोठी घट निर्माण होणार आहे. परिणामी कांद्याचे दर आगामी काळात चढेच राहणार असल्याचं नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलंय.

कांद्याचे हे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं न भूतो असे उपाय योजले आहेत. 

एवढे कठोर उपाय योजूनही कांद्याचा दर आजही पाच ते सहा हजार प्रति क्विंटलच्या घरात आहे. दर आणखी वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने इजिप्तमधून कांदा आयात करण्याचं धोरण आखलं आहे. हा एक लाख क्विंटल कांदा बाजारात आल्यानंतर दर नियंत्रणात येतील, अशी आशा वाणिज्य मंत्रालयाला आहे. 

असं असलं तरी कांद्याच्या दर्जात मोठी तफावत जाणावणार आहे. नाशिकच्या कांद्याची चव जगभरात प्रसिद्ध आहे. परदेशातील कांद्याचा आकार, रंग, वास आणि चव सर्वसामान्यांना फारशी भावत नाही. आयात कांद्यामुळे शेतकरी आणि ग्राहक किती समाधानी होतील, शंकाच आहे. 

  

शिवाय आयात प्रक्रिया पूर्ण होण्यास महिनाभराचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत पोळ कांदा बाजारात येईल आणि दर उतरतील. त्यामुळे याचा नेमका किती उपयोग होणार हे सध्यातरी सांगणं कठीण आहे.