धारावी पुनर्वसन; गौतम अदानींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने

अदानी कंपनीला दिलेल्या धारावी पुनर्विकासाच्या कंत्राटावरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार आमनेसामने आलेत, अदानींसाठी पवार पुन्हा मदतीला धावून आलेत.

Updated: Oct 28, 2023, 11:29 PM IST
धारावी पुनर्वसन; गौतम अदानींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने  title=

Sharad Pawar Support Gautam Adani :  गौतम अदानींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले आहेत. अदानींना धारावी गिळू देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यात दिला होता. मात्र, आता धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत. येत्या दोन तीन दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन त्यांच्या मनातली शंका समजून घेणार असल्याचं विधान शरद पवारांनी केले आहे.

शरद पवार गौतम अदानी यांच्या मदतीला आले धावून

पवार आणि अदानी मैत्रीचं नातं सगळ्यांच्या परिचयाचं आहे. अदानी आणि पवारांचे एकत्र फोटोही व्हायरल झाले होते. अशात उद्धव ठाकरेंनी धारावी गिळू देणार नसल्याची रोखठोक भूमिका घेतली.मात्र पवारांनी त्यावर घेतलेल्या भूमिकेनं पवार पुन्हा अदानींच्या मदतीला धावल्याचं बोललं जातंय. 

गौतम अदानींच्या पॉवरप्लांटचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन

गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवार पाहायला मिळाले. गौतम अदानींच्या पॉवरप्लांटचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. या उदघाटनाचा फोटो शरद पवारांनी ट्विट केलाय.  गुजरातमध्ये गौतम अदानींनी नवा पॉवरप्लँट सुरू केलाय. याच पॉवरप्लांटचं उदघाटन पवारांनी केलंय. 

धारावीचा पुनर्विकास  अदानी समूह करणार

आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास अखेर अदानी समूह करणार आहे. राज्य सरकारने धारावीच्या पुनर्विकासाठी अंतिम मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तेव्हा धारावीच्या साडे सहा लाख झोपडीधारकांचं आता येत्या 7 वर्षात पुनर्वसन करण्यात येणार आहे.. यासाठी 20 हजार कोटींची बोली अदानी समूहाने लावली होती. 

मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा

मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.  जिथं प्रशासक आहेत, तिथं घोटाळे सुरू आहेत, असं ते म्हणाले. एका कंत्राटदाराला टर्मिनेशनची नोटीस देण्यात आलीय. त्याच्यावर कारवाई होणार की खोके घेऊन कारवाई थांबवणार, असा सवाल ठाकरेंनी केला. मोठा गाजावाजा करून नारळ फोडला. मात्र, मुंबईतील तब्बल २५०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे अजूनही सुरूच झालेली नाहीत, असं ते म्हणाले.