बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी ५०० झाडे तोडावी लागणार असल्याची चर्चा होती.

Updated: Dec 9, 2019, 07:51 AM IST
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडू नका; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील नियोजित स्मारकासाठी एकही झाड तोडू नका, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री फोनवरून चंद्रकांत खैरे, औरंगाबादचे नागपूर नंदू घोडले आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रियदर्शनी उद्यानातील एकही झाड तोडले जाणार नाही, असे समजते. 

यापूर्वी शिवसेनेने आरेतील मेट्रो कारशेडमुळे झालेल्या वृक्षतोडीला कडाडून विरोध केला होता. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याच शिवसेनेकडून औरंगाबादेत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वृक्षतोड केली जाणार, अशी चर्चा सुरु झाली होती. शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर अनेकांनी बोट ठेवले होते. 

औरंगबादच्या सिडको भागात हे प्रियदर्शनी उद्यान आहे. या भागात १० हजारापेक्षा अधिक आहेत. १७ एकर परिसरात हे उद्यान पसरले आहे. हा परिसर जैवविविधतेने संपन्न आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी ५०० झाडे तोडावी लागणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होईल, असा आक्षेप घेतला जात होता. मात्र, आता उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर हा आक्षेप निकालात निघाला आहे.

प्रियदर्शनी पार्कात उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ६४ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. उद्यानाच्या १७ एकर जागेपैकी ११३५ स्क्वेअर मीटर परिसरात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाईल. तर २३३० स्क्वेअर जागा फुड पार्क आणि २६०० स्क्वेअर मीटर जागा संग्राहालयासाठी असेल. याशिवाय, ३६९० स्क्वेअर मीटर परिसरात मनोरंजनाच्या सुविधा उभारण्यात येतील.