बिबट्याला कायमची अद्दल घडवण्यासाठी शेतकऱ्यानं अशी लढवली शक्कल, पाहा व्हिडीओ

आपल्या मित्राला वाचवण्यासाठी शेतकऱ्याची नामी युक्ती, बिबट्याला धडा शिकवण्यासाठी काय केलं पाहा व्हिडीओ

Updated: Feb 5, 2022, 08:45 PM IST
बिबट्याला कायमची अद्दल घडवण्यासाठी शेतकऱ्यानं अशी लढवली शक्कल, पाहा व्हिडीओ title=

तुषार तपासे झी 24 तास सातारा : कुत्रा मालकाच्या संपत्तीचं रक्षण करतो. वेळप्रसंगी शत्रूला रोखून धरतो. पण सध्या वेळच अशी आली की मालकाला कुत्र्याचं रक्षण करावं लागत आहे. साता-यातल्या एका शेतक-यानं आपल्या कुत्र्याच्या बचावासाठी अशी काही शक्कल लढवली आहे. ही युक्ती पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत पाहायला मिळत आहे. कधी मानवी वस्तीत बिबटे घुसतो तर काही ठिकाणी शेतावरच्या कुत्र्यांवर हल्ला करत असल्याच्या घटना समोर येतात. जंगलात शिकार मिळत नसल्यानं बिबट्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवला आहे. त्यांचा पहिला बळी ठरतो तो शेतीची राखण करणारा कुत्रा. 

साता-याच्या कास भागातील पांडुरंग कोकरेंचा कुत्रा मात्र बिबट्याला बळी पडणार नाही. कारण मालकानं त्याला खास सिक्युरिटी दिलीये. कोकरेंनी आपल्या कुत्र्यासाठी खिळ्यांचा पट्टाच तयार केला. चुकूनही एखाद्या बिबट्यानं त्यांच्या कुत्र्यावर हल्ला केला तर बिबट्याची काही खैर नाही.

कास कुसुंबीमुरा हे गाव दुर्गम भागात आहे. शेतकरी दिवसभर आपली जनावरं चरण्यासाठी जंगलात घेऊन जातात. गुरांचं रक्षण करण्यासाठी त्यांना कुत्र्यांची मदत होते. मात्र बिबट्यांमुळे कुत्रे सुरक्षित राहिलेले नाहीत. त्यामुळे कोकरेंची ही आयडिया इतर शेतक-यांना चांगलीच भावली आहे. 

कुत्रा म्हणजे शेतक-याचा जिवाभावाचा सवंगडी. आजवर त्यानं शेतीचं रक्षण करून आपल्या मालकाला चांगली साथ दिली. त्यामुळे आपल्या मित्राला वाचवण्यासाठी शेतक-यानं केलेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे.