बरसो रे मेघा! मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर

तो मान्सून अखेर महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झाला आहे.....    

Updated: Jun 16, 2019, 08:05 AM IST
बरसो रे मेघा! मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर  title=

मुंबई : 'वायू' चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीचे परिणाम पाहता महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनच्या वाटचालीक मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. मान्सूमपूर्व सरींनी सध्या राज्यासह अनेक ठिकाणी हवेत गारवा आला असला तरीही यंदाच्या मोसमातील मान्सून मात्र लांबणीव गेला होता. पण, अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. कारण, संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहत होता तो मान्सून अखेर महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झाला आहे. 

कर्नाटकच्या मंगळुरूपर्यंत मान्सून सक्रिय झाल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. येत्या एक ते दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातल्या कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. 'वायू' वादळामुळे लांबणीवर गेलेला मान्सून आता खऱ्या अर्थाने सक्रिय झाला असून तो आता महाराष्ट्रही व्यापेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

कोकणात अजून मान्सून दाखल झाला नसला तरी मान्सून पूर्व पावसाने कोकणात चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसात कोकणात भात पेरणी सुरू झाली आहे. भाताच्या या पेरणीला कोकणात तरवा म्हटलं जातं.. हा तरवा नंतर काढून त्या रोपांची लावणी केली जाते. सध्या कोकणात सर्वत्र अशा प्रकारे तरवा पेरला जात आहे. पावसाच्या दमदार हजेरी मुळे शेतकरी सुखावला आहे लवकरच मान्सून दाखल होईल आणि शेतीची कामंही वेगात सुरु होतील.